क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
‘शेन वॉर्न याने नेहमीच युवा क्रिकेटपटूंना प्रोत्साहन दिले. त्याची मैदानावरील लढाऊ वृत्ती आणि कधीच हार न मानणारा आणि शेवटपर्यंत लढणारा शेनच्या जाण्याने मला जबर धक्का बसल्याचे गोव्याचा माजी रणजी कप्तान स्वप्नील अस्नोडकर म्हणाला. त्याच्या आकस्मिक जाण्याने क्रिकेट जगताची मोठी हानी झाली आहे, असे तो म्हणाला.
स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आवश्यक असलेले सर्व ज्ञान शेनकडे होते आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे असलेले ज्ञान तसेच आपला अनुभव तो नेहमीच शेअर करायचा असे आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या कप्तानपदाखाली खेळलेला गोव्याचा ‘पॉकेट डायनामो’ म्हणून संबोधला जाणारा स्फोटक फलंदाज आणि विद्यमान गोवा 25 वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक स्वप्नील अस्नोडकर म्हणाला.
त्याच्या ‘ऑफ दी फिल्ड’च्या बाबतीत मला बोलायचं नाहीयं, मात्र जेव्हा तो मैदानावर उतरायचा तेव्हा तो वेगळाच शेन असायचा. त्याची लढाऊ वृत्ती आणि कधीच हार न मानण्याचा स्वभाव यामुळेच तो महान ठरल्याची प्रतिक्रिया यावेळी स्वप्नीलने दिली. शेनने नेहमीच युवा आणि नवोदित क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला आणि मार्गदर्शनही पेले. राजस्थान रॉयलसाठी खेळताना शेनने मला नेहमीच पाठिंबा दिला. बिनधास्त खेळ- यामुळे तुझ्या धावाही होतील असे त्याने मला नेहमीच सांगितले. टेंशन घेशील तर तुझी कामगिरी बहरणार नाही, असं शेनने प्रत्येक वेळा मला सांगितले तसे स्वप्नील म्हणाला.
कप्तानपदासाठी आवश्यक असलेले सर्व गुण शेनपाशी होते. तो एक आक्रमक कप्तान होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना राजस्थान रॉयल्सने हातातून गेलेले कित्येक सामने खेचून आणले. 2008 आयपीएल स्पर्धेवेळी पाच सामने खेळल्यानंतर विश्रांतीसाठी राजस्थान रॉयल्सचा संघ गोव्यात आला होता. यावेळी शेन वॉर्न, स्मिथ, तरुवर कोहली व नीरज पटेल हे आमच्या पर्वरीस्थित घरी आले होते. दोन तास शेन आमच्या घरी होता. त्यांनी माझे आजोबा तसेच माझ्या आई-वडिलांशी संवादही साधला. त्या क्षणाची मला आठवण होत आहे, असे स्वप्नील म्हणाला.