बोधगया
बिहारमधील गया जिह्यात शुक्रवारी लष्कराचे एक मायक्रो एअरक्राफ्ट तांत्रिक बिघाडामुळे शेतात कोसळले. गया जिह्यातील बोधगया ब्लॉक अंतर्गत बगदाहा गावात तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानाचे दोन्ही पायलट थोडक्मयात बचावले. या अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. मदत व बचावकार्यादरम्यान ग्रामस्थांनी सदर विमान उचलून शेतातून रस्त्यावर आणले. यासंबंधीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अपघातग्रस्त विमानाने गया येथील आर्मी ऑफिसर्स टेनिंग अकादमी (ओटीए) येथून उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काही अंतर गेल्यावर त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते शेतात कोसळले. अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. विमानाला अन्यत्र हलविताना सैनिकांना बरीच मेहनत घ्यावी लागली. या मदतकार्यावेळी येथे जमलेल्या गावकऱयांना मदतीसाठी विनंती केल्यानंतर लोकांनी विमान खांद्यावर उचलले आणि ते रस्त्यावर आणले. त्यानंतर दुरुस्ती करून ते ‘ओटीए’मध्ये नेण्यात आले.