21 जून पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण पुन्हा सूरू
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीमेला असणारा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावला आहे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद आहे. तसेच पहिला डोस घेतलेल्यांना 84 दिवसानंतर लसीकरण करायचे आहे. यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक येत आहे. मात्र गर्दी कमी झाल्याने लस सहज उपलब्ध होत आहे.
एप्रिल-मे महिन्यात जिह्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले होते. तर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. पहाटे पाच वाजल्यापासून लस घेण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय, कस्तुबा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र गोडोली येथे नागरिकांची गर्दी उसळत होती. या गर्दीतही कोरोनाची धास्ती सोबत असताना लसीचा पहिला डोस अनेकांनी घेतला. सर्वच लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव होता. यांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागला. त्यानंतर दुसरा डोस 45 दिवसांनी घ्यायचा असतो. मात्र कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसांनी घेण्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे दुसऱया डोससाठी गर्दी करणाऱयांची संख्या कमी झाली. याच पार्श्वभूमीवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होते. ते बंद करण्यात आले. यामुळे लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत. आता प्रत्येक केंद्रावर दुसरा डोस घेण्यास नागरिक येत आहेत. त्यांना गर्दी नसल्याने लस सहज उपलब्ध होत आहे. तसेच लसीचे डोसही शिल्लक राहत असल्याचे जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.
21 जूनपासून पुन्हा लसीकरण
45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासोबत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यामुळे लसीचा तुटवडा निर्माण झाला. यात जेष्ठ नागरिकांची पिळवणूक झाली. तसेच ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याची संख्या कमी होती. यामुळे 18 ते 44 वयोटातील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले. ते आता येत्या 21 जूनपासून सूरू होणार आहे.