आरोग्य कर्मचाऱयांना दिल्या मार्गदर्शक सूचना,
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या माध्यमातून कस्तुरबा लसीकरण केंद्रावर नेटके नियोजन करण्यात आलेले असूनही दोन दिवसांपूर्वी लसीकरणाच्या टोकन वाटपावरुन गोंधळ निर्माण झाला होता. नगरसेवक अविनाश कदम यांनी लसीकरणात वशिलेबाजीचा आरोप केला होता. येथील वशिलेबाजीत पोलिसांनी हस्तक्षेप करत आरोग्य कर्मचाऱयांना मार्गदर्शक सूचना केल्या.
कस्तुरबा रुग्णालयातील लसीकरण केंद्रामध्ये लस घेण्यासाठी वशिला चालत असल्याचा आरोप झाल्यानंतर व प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली होती. त्याच दिवशी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सर्व टोकन पाहिले होते. ते टोकन आडनिड नंबरचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्या टोकन घेतलेल्यांचे म्हणणे समजून घेतले होते. शनिवारी पोलीस अधिकारी लसीकरण केंद्रावर पोहोचले. त्यावेळी केंदावर चाललेला प्रकार पाहून अधिकारी चांगलेच संतापले. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱयाला बोलवून सुरू असलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणायला हवी. त्यासाठी प्रारंभी केवळ 100 टोकन वाटा आणि त्यांनाच लस द्या. बाकींच्याची अनावश्यक गर्दी होता कामा नये. त्यानंतर लस शिल्लक असेल तर जे येतील त्यांना द्या. यात कोणी वशिलेबाजी करु लागला तर आमच्या पोलिसांना सांगा, ते मला सांगतील मी लगेच येतो, असेही अधिकाऱयांनी सांगितले.