उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ
उंब्रज / प्रतिनिधी :
उंब्रज ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सिरिंज विकत आणण्यासाठी भाग पाडल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच डेटा ऑपरेटर लस टोचत असल्याने घटनास्थळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओमायक्रॉनच्या भीतीने सध्या सर्वत्र लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. उंब्रज ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी सुरू आहे. मात्र येथील कामकाजाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते. दुपारी १२.३० पर्यत सुमारे १०० हुन अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. सकाळी लसीकरणाला सुरुवात झाली मात्र लसीकरणा दरम्यान सिरिंज उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत नागरिकांना सिरिंज खाजगी मेडिकल मधून विकत आणावयास सांगितले. नागरिकांनी मेडिकलमधून सिरिंज विकत आणल्यानंतर या नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होते. दरम्यान शासन लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. संबंधित आरोग्य केंद्रांनाही तातडीने लसीकरणासाठी सिरिंज उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली आहे. मात्र असे असतानाही उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांना सिरिंज बाहेरून विकत आणण्यास भाग पाडले जात आहे. याप्रकाराने नाराजी निर्माण झाली आहे.मागील पंधरा दिवसापासून सिरिंज व पॅरासिटामॉल गोळ्यांचा सावळा गोंधळ उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी आवश्यक सिरिंज व साधने उपलब्ध करुन दिलेली आहेत. उंब्रज आरोग्य केंद्रातील ही पहिलीच तक्रार आहे. याबाबत शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.