जगातील सर्वात मोठा कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अखेर कोरोना लसीकरणाला आज शनिवारपासून भारतात सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. लसीकरणाची संपूर्ण माहिती, साठवणूक, नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेले डिजिटल प्लॅटफॉर्म को-विन ऍप सुद्धा 16 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. भारतात होणारी ही मोहीम जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम ठरणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरण मोहीम कशा पद्धतीने राबवावी याची सुस्पष्ट माहिती देण्यात आली आहे.
16 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 3,006 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले जाणार आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे हा लसीकरण कार्यक्रम होणार आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील प्रत्येक लस केंद्रांवर दिवसभरात सुमारे 100 लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. म्हणजेच जवळपास तीन लाख लाभार्थ्यांना पहिल्या दिवशी लस देण्यात येणार आहे. त्यानंतर कांही दिवस लस घेणाऱयांवर वैद्यकीय तज्ञांची नजर राहणार आहे.
देशाच्या कानाकोपऱयात पोहोचली लस
लसीकरणापूर्वी सर्व राज्यांना लसींचे डोसेस पाठवण्यात आले आहेत. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे एकूण 1.65 कोटी डोसेस राज्यांना पाठवण्यात आले आहेत. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्मयता गृहीत धरून प्रति 100 कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या डोसेस वाटपात कोणत्याही राज्यावर भेदभाव करण्यात आला नसल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हा कोरोना लसींचा प्राथमिक पुरवठा असून पुढील आठवडय़ात पुन्हा वैद्यकीय कंपन्यांकडून लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे.
समस्या निराकरणासाठी हेल्पलाईन
कोविड-19 महामारी, लसीकरण मोहीम आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सरकारच्या वतीने एक ‘कॉल सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेसंबंधी अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ‘1075’ हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. हा क्रमांक चोवीस तास सुरू राहणार असून त्यावर कोरोना संसर्ग, लसीकरण मोहीम आणि को-विन ऍप्लिकेशनशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.
28 दिवसांनी दुसरा डोस…
औषध नियामक मंडळाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली असून 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागणार आहेत. केंद्र सरकारने यावेळी लसची अदलाबदल केली जाऊ नये असे स्पष्ट सांगितले आहे. पहिला डोस ज्या लसीचा देण्यात आला होता, त्याच लसीचा डोस दुसऱया वेळी दिला जावा, असे केंद्राने नमूद केले आहे.