18 वर्षांवरील लाभार्थींना मिळणार थेट डोस- लसींचा अपव्यय टाळण्यासाठी नियमात बदल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील नागरिकांसाठीच्या लसीकरण नियमात बदल केला आहे. नवीन नियमानुसार नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर डोस घेता येणार आहे. राज्यांनी केलेल्या वेगवेगळय़ा सूचना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारावर, केंद्र सरकारने आता ऑन-साईट रजिस्ट्रेशन आणि समूह नोंदणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. तसेच लसींचा अपव्यय टाळण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने नियमावलीत केलेल्या बदलानुसार आता 18 ते 44 वर्षांच्या व्यक्तींसाठी ऑन-साईट रजिस्ट्रेशन आणि अपॉईंटमेंट सुरू केल्या आहेत. ही सुविधा सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रांसाठीच आहे. सध्या खासगी लसीकरण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसली तरी तेथे ऑनलाईन अपॉईंटमेंटची माहिती स्लॉटसह प्रकाशित करावी लागणार आहे. यासंबंधी राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशांचे सक्तीने पालन करण्यासाठी सर्व जिल्हय़ाच्या लसीकरण अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. तसेच लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी रितसर नियोजन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
लसीकरणाची वेळ संपली की लस वाया घालवू नये म्हणून ऑनसाईट व्हॅक्सिनची संकल्पना पुढे आली आहे. कोविन प्लॅटफॉर्मवर या नवीन प्रणालीचा उल्लेख केला जात आहे. नियमात केलेल्या बदलामुळे आता लसीकरणासाठी दिलेल्या नियोजित वेळेत जर लोक लसीकरणासाठी आले नाहीत आणि जर दिवसाखेरीज काही लसीचे डोस शिल्लक राहतात. हे डोस वाया जाऊ नयेत म्हणून काही व्यक्तींना को-विन साईटवर रजिस्ट्रेशन करून लस दिली जाणार आहे. मात्र, को-विन, आरोग्य सेतू आणि उमंग यांसारख्या ऍपद्वारे होणारी नोंदणीही सुरू राहणार आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनही नाही, अशा व्यक्ती थेट लसीकरण मोहिमेचा फायदा घेऊ शकतात.
समूह लसीकरण सुविधेची संधी
समुहात येणाऱया व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी स्पेशल सेशन्सही आयोजित करता येणार आहेत. जिथे इंटरनेटचा वापर न करणाऱया, तसेच स्मार्टफोन नसणाऱया व्यक्तींना लसीकरणासाठी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. या सुविधेमुळे कंपन्या किंवा संस्था लसीकरण अधिकाऱयांशी संपर्क साधून विशेष लसीकरण मोहीम राबवू शकतात.
लस तुटवडय़ाची समस्या
देशात कोरोना विरुद्धचा लढा तीव्र करताना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. 45 वर्षांवरील लोकांना नोंदणी न करता लसीकरण केले जात आहे. मात्र, सध्या बऱयाच भागात लसींचा तुटवडा असल्याने मोहिमेला गती आलेली दिसत नाही. वयोमर्यादा शिथिल केल्यानंतरही लसींचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात होत नसल्यामुळे सध्या बरेच लोक दुसऱया डोसच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहेत.
सरकारने नियमात का केला बदल ?
लसीकरणासाठी स्लॉट बुक करूनही बरेच लोक लसीकरण केंद्रावर निर्धारित वेळेत पोहोचत नसल्यामुळे लस खराब होण्याचे प्रकार समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियम बदलाचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ग्रामीण स्तरावर ऑनलाईन बुकिंगची माहिती नसल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे ‘ऑन-साईट’ नोंदणीचा पर्यायही वापरला जात असल्याची स्पष्टोक्ती सरकारने दिली आहे.