नव्या संशोधनाचा निष्कर्ष – आजारी पडल्यास स्थिती गंभीर होणार नाही
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोरोना लसीच्या प्रभावावर सातत्याने संशोधन सुरू आहे. लस घेतल्यावर कुठलाही व्यक्ती संक्रमित होणे आश्चर्यकारक नाही, लस न घेतलेल्या लोकांच्या तुलनेत मात्र असे लोक कमी प्रमाणात संक्रमित झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेत जानेवारीपासून 30 एप्रिलदरम्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 10 कोटी 10 लोकांच्या अध्ययनात 10 हजार 262 जण संक्रमित झाल्याचे आढळून आले. हे प्रमाण केवळ 0.01 टक्केच आहे. तर अन्य एका अध्ययनातून लस घेतलेले 90 टक्के आरोग्य कर्मचारी संक्रमणापासून बचावल्याचे दिसून आले आहे.
संक्रमणाचा इतका कमी दर पाहता लस प्रभावी ठरत असल्याचा पुरावा मिळत आहे. कुठलीही लस लोकांचा संसर्गापासून 100 टक्के बचाव करत नाही. अमेरिकेत तिन्ही लसी फायजर-बायोएनटेक, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनला संसर्गापासून नव्हे तर कोविड-19 च्या लक्षणांपासून बचावाच्या क्षमतेच्या आधारावर मंजुरी मिळाली असल्याचे एमोरी विद्यापीठातील साथरोगतज्ञ डॉ. कार्लोस डेल रियो यांनी म्हटले आहे.
लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचा दर कमी राहिला आहे. सुमारे 4 हजार आरोग्य कर्मचाऱयांच्या अध्ययनातून फायजर, मॉडर्नाची लस 90 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आल्याची माहिती सीडीसीने दिली आहे.
10 कोटींहून अधिक लोकांच्या नव्या अध्ययनाचे निष्कर्ष आश्चर्यजनक आहेत. केवळ 0.01 टक्के संक्रमणाचा दर आणि अधिक लोक गंभीर आजारी न होणे लसींच्या जादुई प्रभावाचा संकेत असल्याचे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील महामारी विषयक प्राध्यापक डॉ. बोनी मेलडोनाडो यांनी सांगितले आहे.
संशोधकांनी लस घेतल्यावर संक्रमित झालेल्या 5 टक्के जणांच्या नमुन्याची तपासणी केली आहे. निम्म्याहून अधिक संग्रमण सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या बी.1.1.7 व्हेरियंटने झाल्याचे दिसून आले. एक चतुर्थांश संक्रमणात कॅलिफोर्निया व्हेरियंटची भूमिका आहे. लस घेतलेल्या लोकांचा संक्रमित होण्याचा दर पाहता अन्य वेरियंटच्या विरोधातही लसींची इम्युनिटी काम करत असल्याचे स्पष्ट आहे. संसर्ग झाला तरीही बहुतांश प्रकरणांमध्ये आजार कमी गंभीर असेल.
संक्रमणाची माहिती देणे स्वैच्छिक असल्याने लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमण झाल्याची खरी संख्या समोर आली नसेल. याचबरोबर कोरोनाबाधित झालेल्या अनेक लोकांमध्ये लक्षणे दिसून आली नसावीत. याचमुळे त्यांनी चाचणी करवून घेतली नसेल. लसीकरणानंतर संक्रमणाचा दरनिश्चितपणे खूपच कमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
लसीकरणात असमानता
अमेरिकेत लसीकरणात असमानता दिसून आली आहे. सामाजिक, आर्थिक दृष्टय़ा कमजोर भागांमध्ये लसीकरणाचा दर कमी आहे. सीडीसीच्या संशोधकांनुसार कमजोर क्षेत्रांच्या 42 टक्के लोकांनाच लस मिळाली आहे. दुसरीकडे सधन क्षेत्रांमध्ये 60.1 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. सीडीसी अमेरिकेच्या काउंटींचे सामाजिक, आर्थिक स्तर, वंश, कुटुंबांची स्थिती, वाहतूक आणि अन्य सुविधांच्या आधारावर निर्देशांक तयार करते. अमेरिकेत शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये कोरोनाबळींची संख्या अधिक राहिली होती.