हजारो लोकांचा जीव वाचविण्याची कामगिरी
श्वान, मांजर, कबूतर आणि घोडय़ाच्या कथा अनेक ऐकल्या असतील. पण आफ्रिकन जातीच्या एका उंदराच्या शौर्याचे किस्से सध्या चर्चेत आले आहेत. जेथे अत्याधुनिक यंत्रसामग्री अयशस्वी ठरतात, तेथे या उंदराच्या गंधक्षमतेने आतापर्यंत 71 भूसुरुंगांचा शोध लावून हजारो लोकांचा जीव वाचविला आहे.
कंबोडियामध्ये मगावा नावाचा हा उंदिर 7 वर्षांचा आहे. देशात भूसुरुंगांचा शोध लावण्यासाठी या उंदराला विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. मगावाने स्वतःची कामगिरी चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. त्याने 28 जिवंत स्फोटकांचा शोध लावून कित्येकांचा जीव वाचविला आहे.
मगावाला एपीओपीओ नावाच्या संघटनेने प्रशिक्षित केले होते. ही संघटना उंदरांना भूसुरुंग आणि बॉम्बचा शोध लावण्याचे प्रशिक्षण देते. मगावा अद्याप चांगल्या आरोग्य स्थितीत असला तरीही त्याच्या सेवानिवृत्तीची वेळ आली असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मगावाची कामगिरी नाबाद राहिली आहे. मला त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचा गर्व आहे. तो छोटा असला तरीही त्याने कित्येकांचा जीव वाचविण्यास मदत केली असल्याचे उद्गार मगावाच्या हँडलर मालेन यांनी काढले आहेत.
मगावाची उणीव भरून काढणे सोपे नाही, पण संघटनेने काही नव्या उंदरांची भरती केली आहे. यात 20 नव्या प्रशिक्षित लँडमाइन डिटेक्शन उंदरांचा एक समूह असून त्याने प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ब्रिटिशनमधील पीडीएसए या धर्मादाय संस्थेकडून मगावाचा सन्मान करण्यात आला आहे. पीडीएसए दरवर्षी उत्तम कार्य करणाऱया प्राण्यांना पुरस्कृत करते. या संस्थेच्या 77 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उंदराने पुरस्कार मिळविला आहे.
मगावाने दक्षिणपूर्व आशियाई देश कंबोडियामध्ये 15 लाख चौरस फुटांच्या भागाला भूसुरुंगापासून मुक्त करण्यास मदत केली होती. हे भूसुरुंग 1970 आणि 1980 च्या दशकात कंबोडियात गृहयुद्ध पेटले असताना पेरण्यात आले होते. या गृहयुद्धादरम्यान शत्रूला मारण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर भूसुरुंग पेरले गेले होते. पण गृहयुद्ध संपल्यावर हे भूसुरुंग सर्वसामान्यांचा जीव घेत होते.