ऑनलाईन टीम / पिंपरी :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार अनेकांनी अजून कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी 20 जुलै पर्यंत दोन्ही डोस घ्यावेत अन्यथा पगार स्थगित केला जाईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोका सांगे ब्रम्हज्ञान..सारखा हा धक्कादायक प्रकार आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास येताच कठोर निर्णय घेतला आहे. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या आधिकाऱ्यांचा जुलै महिन्यातील पगार रोखण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांना दिला आहे. आयुक्तांनी यासाठी 20 जुलैची डेडलाइन दिली आहे.
दरम्यान, मागील तीन महिन्यात दोनवेळा याबाबतचा लेखी आदेश दिल्यानंतरही कर्मचारी आणि आधिकाऱ्यांनी अद्याप लस घेतली नसल्याचे समोर आल्याने राजेश पाटील यांनी कडक पाऊल उचलले आहे.
याआधी 31 मार्च रोजी लसीकरण करुन घ्यावे, असा पहिला आदेश राजेश पाटील यांनी दिला होता. त्यानंतर सहा मे रोजी दुसरा आदेश काढला होता. मात्र, त्यानंतरही बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही. कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच आयुक्तांन कठोर निर्णय घेतला आहे.