म्हापसा /, प्रतिनिधी :
वागातोर-हणजुण येथील एका व्यवसायिकांकडून दोन लाख रुपयांची लाच स्विकारतांना हणजुण-कायसुव पंचायतीचे पंच सदस्य हनुमंत गोवेकर यांना शनिवारी दुपारी लाच प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत असलेले अन्य दोन पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर व शीतल दाभोलकर घटनास्थळावरून बेपत्ता झाल्याने संबंधित पथकाकडून त्यांच्या घरासमोर कडक पोलिस पहारा ठेवण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार याभागातील वोझरान-वागातोर परिसरात एका हॉटेल व्यावसायिकांकडून होत असलेल्या बांधकामावरून सदरचे बांधकाम बेकायदा असल्याचा दावा करीत हणजुण-कायसुव पंचायतीचे पंच सदस्य हनुमंत गोवेकर तसेच फरार पंच सदस्यांनी सदर व्यवसायिकाच्या विरोधात संबंधित प्राधिकरण तसेच सागरी किनारा क्षेत्र कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सदरचे प्रकरण मिटवीण्यासाठी पंच सदस्य हनुमंत गोवेकर, तसेच इतरांनी संबंधित बांधकाम व्यवसायिकांकडे वीस लाख रुपयांची लाच मागीतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, हणजुण-कायसुव पंचायतीचे पंच सदस्य हनुमंत गोवेकर तसेच इतरांनी लाचच्या रुपात मागितलेल्या वीस लाख रुपयांपैकी दोन लाखांचा प्रथम हप्ता हणजुण येथील पेट्रोल पंप परिसरात घेतेवेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी छापा टाकला असतां हनुमंत गोवेकर याला रंगेहात ताब्यात घेतले. शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत हणजुण पोलिस स्थानकात लाचलुचपत विभागाचे अधिकारी ठाण मांडून होते दरम्यान, लाच स्विकारतांना अधिकार्यांना चकवून घटनास्थळांवरुन फरार झालेल्या संशयित पंच सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक त्यांच्या घरासमोर ठाण मांडून होते. तथापि, रात्री उशिरापर्यंत संशयित पंच सदस्य लाचलुचपत आधिकार्यांच्या हाती लागले नसल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.दर वेळी हे तिघे आर टी आई घालून लोकांना चकमा देत होते मात्र तेच जाळत अडकले. गावात हा चर्चेचा विषय बनला होता.