प्रतिनिधी/ लांजा
कुटुंबातून विभक्त राहण्यास देत नाहीत या रागातून एका 34 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरातील अँगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी 1 च्या सुमारास शहरातील साटवली रोड पोलीस वसाहती शेजारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. एकत्र कुटुंबापासून विभक्त होण्यासाठी आत्महत्या करण्यात आलेली ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस वसाहत नजीक राहणाऱया प्रीती हरेश पटेल (34 वर्षे) ही विवाहिता एकत्र कुटुंबात राहत होती. मात्र कुटुंबात तिचे मतभेद झाल्याने तिला कुटुंबापासून विभक्त राहायचे होते. वेगळे राहायला दिले जात नसल्याच्या नैराश्यातून प्रिती पटेल हिने रविवारी दुपारी घरात खोलीमध्ये अँगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली .
याबाबतची खबर विनोद पुरुषोत्तम पटेल (39 वर्षे) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करत आहेत.