प्रतिनिधी / कोल्हापूर
मटका कारवाईमध्ये मटकाबुकी मालकाकडून सहआरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, त्यापैकी 40 हजारांची लाच पंटराकरवी स्विकारल्या प्रकरणी गेल्या दोन दिवसापासून पसार असलेल्या राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र पोवार (बक्कल नंबर 1641) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभागच्या अधिकाऱयांनी सोमवारी दुपारी अटक केली. या दोघांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
या लाचप्रकरणी आतापर्यत अटक केलेल्या संशयीत आरोपीची संख्या तीन झाली आहे. तसेच अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षक गुरव व कॉन्स्टेबल पोवार हे दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होते. या काळात हे दोघे कोठे आश्रयाला होते. तसेच तक्रारदार प्रताप मोरे (रा. दत्तनगर, शिंगणापूर रोड, कोल्हापूर) यांच्याकडे 60 हजारांच्या लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्षक गुरव, कॉन्स्टेबल पोवार, पंटर रोहित सोरपसह आणखीन एक राजारामपूरीचा कॉन्स्टेबल होता. याबाबत तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी तो कॉन्स्टेबल आणि पंटर कोण ? याविषयी अटक केलल्या पोलीस उपनिरीक्षक गुरव व कॉन्स्टेबल पोवार या दोघाकडे चौकशी सुरु केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गुरव, कॉन्स्टेबल पोवार, पंटर रोहित रामचंद्र सोरप (रा. उजळाईवाडी, ता. करवीर) व आणखीन एक कॉन्स्टेबल व पंटर अशा पाच जणानी प्रताप मोरे यांच्याकडे मटक्याच्या कारवाईत अटक करायचे नसेल तर 60 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून लाच मागणी केली. या कारवाईच्या भितीने मोरेने त्वरीत एटीएम सेंटरमधून 20 हजार रुपये काढून कॉन्स्टेबल पोवारकडे दिले. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक गुरव यांनी उरलेले 40 हजार रुपये पोलीस पोवार यांच्याकडे आणून द्यावे, असे सांगितले होते.
याविषयी मोरेनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी सापळा लावून, 40 हजारांच्या लाचेचे पैसे स्विकारताना पंटर सोरपला शनिवारी रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईची कुणकुण लागताच पोलीस उपनिरीक्षक गुरव व कॉन्स्टेबल पोवारने पलायन केले. त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी त्यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. तरीदेखील हे दोघे मिळून आले नसल्याने या दोघांचा दोन दिवसापासून शोध घेतला जात होता. यादरम्यान हे दोघे सोमवारी दुपारी स्वत:हून लाचलुचपत अधिकाऱयांच्या समोर हजर झाले.