ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. डीएलएफ लाचखोरी प्रकरणात सीबीआयने लालूंना क्लीन चिट दिली आहे. ही क्लीन चिट माजी संचालक ऋषीकुमार शुक्ला यांच्या कार्यकाळातही देण्यात आली होती.
सीबीआयने 2018 मध्ये पीईची प्राथमिक चौकशी म्हणून लालूंवर गुन्हा दाखल केला होता. परंतु, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. त्यामुळे ही फाईल बंद करण्यात आली आणि लालू प्रसाद यांना क्लीन चिट देण्यात आली.
काय होते प्रकरण?
2007 मध्ये कथित शेल कंपनी एबी एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये 5 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. ही वसाहत डीएलएफने बांधली होती. त्यानंतर 2011 मध्ये लालू यादव यांची मुले तेजस्वी, चंदा आणि रागिणी यांनी एबी एक्सपोर्टला चार लाख रुपयांना विकत घेतले. लालूंना चार लाख रुपयांत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर एबी एक्सपोर्टच्या माध्यमातून डीएलएफने लालूंना लाच दिल्याचा आरोप करण्यात आला. नवी दिल्ली रेल्वे स्थानक आणि वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्रकल्पाच्या बदल्यात ही लाच देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.