व्हिएन्नामध्ये रस्त्यांवर उतरले हजारो लोक : लॉकडाउन हटविण्याची घोषणा
वृत्तसंस्था / व्हिएन्ना
कोरोना संकट कायम असताना अनेक देशांमध्ये महामारी रोखण्यासाठीच्या निर्बंधांना विरोध होतोय. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये कोरोना लसीकरण अनिवार्य करणे आणि लस न घेतल्यास घरात कैद राहण्याच्या नियमाच्या विरोधात रविवारी पुन्हा निदर्शने झाली. लोकांनी रस्त्यांवर धाव घेत घोषणाबाजी केली. ‘व्हॅक्सिन फॅसिस्टवाद मंजूर नाही’ अशी घोषणाही काही जणांकडून देण्यात आली. तर ‘मी नवनाझी किंवा गुंड नाही’, ‘स्वातंत्र्यासाठी आणि लसविरोधात लढतोय’ असे मजकूर असलेले फलक तेथे झळकले आहेत.
काही ठिकाणी निदर्शकांनी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याने ठिकठिकाणी पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली. रविवारच्या निदर्शनांमध्ये सुमारे 44 हजार लोकांनी भाग घेतला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या निदर्शनांमुळे ऑस्ट्रियाच्या सरकारवरील दबाव वाढल्याने देशभरातील लॉकडाउन हटविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
सरकारच्या नव्या आदेशानुसार लस न घेणारे लोक आता घरांमधून बाहेर पडत खरेदी आणि व्यायाम यासारख्या आवश्यक कामांसाठी जाऊ शकतील. परंतु त्यांना दर दोन दिवसांनी कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. तर लसीकरण झालेले आणि कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांचे जीवन सुरळीत होणार आहे. सलग चौथ्यांदा वीकेंडवर निदर्शने झाली आहेत.
14 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी फेब्रुवारीपासून लसीकरण अनिवार्य करणारा ऑस्ट्रिया हा युरोपीय महासंघातील पहिला देश आहे. लस न घेतल्यास 50 हजार रुपयांपासून 3 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. देशात आतापर्यंत 69 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनाच लसीकरणापासून सूट आहे. देशात आतापर्यंत 13 लाख कोरोनाबाधित सापडले असून 13 हजार जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियातही निदर्शने
ऑस्ट्रेलियात लसीकरण अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या विरोधात रविवारी निदर्शने झाली. मेलबर्नमध्ये हजारो लोक संसदेबाहेर एकवटले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. निदर्शकांनी दोन वर्षांनी आयोजित होत असलेली मेलबर्न मॅराथॉन रोखण्याचाही प्रयत्न केला. सिडनीमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. तर गोल्ड कोस्टनजीक क्वीन्सलँड सीमा खुली करण्यापूर्वीच निदर्शक तेथे जमा झाले.
जॉन्सन यांची तुलना हिटलरसोबत
नव्या निर्बंधांच्या विरोधात ब्रिटनची राजधानी लंडनमध्येही निदर्शने झाली आहेत. निदर्शकांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची तुलना ‘हिटलर’सोबत करत ‘भेदभाव सहन केला जाणार नाही’ अशा घोषणा दिल्या आहेत. नेदरलँड्स, क्रोएशिया, जर्मन आणि इटलीतही निर्बंधांच्या विरोधात लोकांचा संताप दिसून येत आहे.