स्कॉटलंडच्या पंतप्रधानांचा लॉकडाउन हटविण्यास विरोध : जगभरात आतापर्यंत 61.78 लाख कोरोनाबाधित
जगभरात आतापर्यंत 61 लाख 83 हजार 559 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 27 लाख 53 हजार 918 जणांनी कोरोना संसर्गावर मात करण्यास यश मिळविले आहे. कोरोनाबळींचा आकडा 3 लाख 71 हजार 364 वर पोहोचला आहे. स्कॉटलंडच्या पंतप्रधान निकोला स्टर्जन यांनी लॉकडाउन न हटविण्याचे आवाहन ब्रिटनला केले आहे. ब्रिटनच्या लॉकडाउनचे नियम हटविण्याचा नियम न मानण्याचे आवाहन स्टर्जन यांनी स्कॉटलंडवासीयांना केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याची गरज आहे. विषाणू संसर्गाचा धोका टळलेला नाही. सतर्क न राहिल्यास संसर्ग पुन्हा फैलावू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
नेपाळ : लॉकडाउन वाढले
नेपाळमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन 14 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. नेपाळ सरकारचे प्रवक्ते युवराज खातीवाडा यांनी शनिवारी याची पुष्टी दिली आहे. काठमांडूच्या ज्या भागात अधिक प्रमाणात रुग्ण सापडले आहेत, तेथे सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द हिमालयन टाईम्सनुसार सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे 30 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
पाकमध्ये मास्क अनिवार्य
पाकिस्तानात गर्दीयुक्त सार्वजनिक ठिकाणांवर मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. देशात 24 तासांत 3,039 रुग्ण आढळल्यावर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या ठिकाणांमध्ये मशीद, बाजार, शॉपिंग मॉल आणि सार्वजनिक परिवहन सेवा सामील आहे. पाकिस्तानात 69 हजार 496 रुग्ण सापडले असून 1,483 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
ब्राझील : बळी वाढले
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत 30 हजारांपेक्षा अधिक नवे बाधित सापडले आहेत. देशातील रुग्णांची संख्या 5 लाखांसमीप पोहोचली आहे. तेथे दिवसभरात 890 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींचा एकूण आकडा आता 28,849 झाला आहे. ही संख्या फ्रान्सपेक्षाही अधिक झाली आहे.
ब्रिटनमध्ये वाढीव सूट
ब्रिटनमध्ये सोमवारपासून संसर्गाबद्दल अधिक संवेदनशील लोकांनाही घरातून बाहेर पडण्याची अनुमती दिली जाणार आहे. सरकारने रविवारी निर्बंधांच्या नव्या नियमावलीची घोषणा करण्यापूर्वी याची माहिती दिली आहे. नव्या नियमांच्या अंतर्गत संसर्गाचा अधिक धोका असलेले लोक कुटुंबीयांसोबत बाहेर पडू शकतील. एकटे राहणारे व्यक्तीदेखील बाहेरील एका व्यक्तीची भेट घेऊ शकणार आहेत.
बेल्जियम : राजपुत्राला बाधा
बेल्जियमचे राजपुत्र जोआकिम (28 वर्षे) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. रॉयल पॅलेसनुसार जोआकिम 26 मे रोजी इंटर्नशिपसाठी स्पेनमध्ये गेले होते. दोन दिवसांनी ते एका पार्टीत सामील झाले होते. स्पेनच्या कोर्डोबा शहरात झालेल्या पार्टीत सामील 27 जणांमध्ये जोआकिम यांचा समावेश आहे. स्पेनच्या लॉकडाउनच्या नियमांनुसार तेथे सध्या 15 पेक्षा अधिक जणांच्या एकत्र येण्यावर बंदी असूनही ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. सध्या या पार्टीत सामील सर्व जण क्वारंटाइनमध्ये आहेत.
व्हेनेझुएलात शिथिलता
व्हेनेझुएलाने लॉकडाउनमध्ये आंशिक दिलासा देण्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी 1 जूनपासून देशाच्या 9 आर्थिक क्षेत्रांना खुले केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. निर्बंधांदरम्यान सूट देण्यादरम्यान सीमावर्ती शहरे बंद राहणार आहेत. पुढील 10 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये अन्नधान्याची स्टोअर्स आणि आरोग्य सुविधा सुरू होणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांना मंजुरी दिली जाणार आहे.
अमेरिका : 960 मृत्यू
अमेरिकेत एका दिवसात 960 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांमध्ये 23 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत 1 लाख 5 हजार 557 जणांचा बळी गेला आहे. तर 18 लाख 16 हजार 897 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.
सौदीत 1,618 नवे रुग्ण
सौदी अरेबियात 1,618 नवे रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील बाधितांचा आकडा वाढून 83 हजार 384 वर पोहोचला आहे. यादरम्यान 22 जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा वाढून 480 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 58,883 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री तौफीक अल रबिया यांनी जनतेला केले आहे.