ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तरखंडमधील भाजपाचे आमदार गणेश जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी असलेल्या आदरापोटी त्यांचे गुणगान गाणारी आरती लॉन्च केली आहे. त्यानंतर त्यांनी मोदींचे मंदिर बांधण्याची घोषणा केली आहे.
गणेश जोशी हे मसुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. कोरोना योद्ध्यांसाठी शुक्रवारी आयोजित कौतुक सोहळ्यात त्यांनी आरती लाँच केली. रेणू पंत यांनी ही मोदींची आरती लिहिली असून, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री धन सिंग रावत यांच्या उपस्थितीमध्ये या आरतीसंदर्भात घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना जोशी म्हणाले, मोदी हे राष्ट्रीय नेते नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांची आरती लॉन्च करून मी कोणतीही चूक केली नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर मी मोदींची भव्य मूर्ती असणारे मंदिर उभारणार आहे. मंदिर उभारणे चुकीचे नाही. लोकांनी सोनिया गांधी आणि रजनिकांतचे मंदिर उभारले आहे.
जोशी यांनी मोदींची आरती प्रकाशित केल्यानंतर शनिवारी विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने यावर आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जोशी यांनी आपण मोदींची आरतीच नाही तर मंदिरही बांधणार असल्याची घोषणा केली.