ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चलला आहे. मुंबईत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी स्वतः करण जोहरने ट्विट करत दिली आहे.
करण आपल्या ट्विट मध्ये म्हणाला की, माझ्या घरातील दोन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोघांनाही घराच्या बिल्डिंगमध्ये वेगळया भागात ठेवण्यात आले आहे तसेच संपूर्ण इमारत सॅनिटाईज करण्यात आली आहे.
कुटुंबातील अन्य लोक आणि संपूर्ण स्टाफ सुरक्षित आहे. इतरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाही आहेत. आम्ही सर्वांनीच आज सकाळी कोरोनाची तपासणी करून घेतली आहे. सर्वांचे रिपर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आम्हां सर्वांना 14 दिवस विलगीकरणात ठेवले आहे, करणने सांगितले.
दरम्यान, करणची राहती बिल्डिंग सध्या सील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे करणने आज आपला 48 वा वाढदिवस साजरा केला असून सर्वांनी त्याला ऑनलाइन शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या दिवशी कोरोनाने घरात शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील नोकरांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त होते.