ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन वाढवल्यानंतर राज्य सरकारनेही 30 जूनपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ३ जून, ५ जून आणि ८ जूनपासून काही गोष्टींना सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे.
लॉकडाऊन 5.0 मध्ये तीन टप्प्यात निर्बंध उठवण्यात येणार आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथिलता नसेल. रेड आणि नॉनरेड झोनमध्ये 3 जूनपासून जॉगिंग, धावणे, सायकल चालवणे, व्यायाम करणे आणि उद्यानात जाण्यास परवानगी असेल. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
5 जूनपासून मार्केट कॉम्प्लेक्स, मॉल्स, हॉटेल्स वगळता सर्व दुकाने सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू करता येतील. ही दुकाने सुरू करण्यासाठी सम विषम तारखांची अट घालण्यात आली आहे. कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहतील. दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत अथवा होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरावेत. खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत अथवा सायकलने जावे. अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई असेल. खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
8 जूनपासून सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी उपस्थिती चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी 1 चालक 1 प्रवासी, रिक्षा 1 चालक 2 प्रवासी, खाजगी चारचाकी 1 चालक 2 प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास तूर्तास बंद राहतील. सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्याचे हॉल बंद राहतील. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाला बंदी आहे. सलून, स्पा सेंटर बंद राहतील. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासही बंदच राहील.