जिल्हाधिकारी-अधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणूक 17 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. जिल्हय़ाची मतमोजणी आरपीडी महाविद्यालयामध्ये होणार असून शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन आणि जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन पाहणी केली. स्ट्राँगरुम तसेच मतमोजणी करण्याबाबत त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. इतर अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी योग्य नियमावली करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होऊ नये याची योग्य ती काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रापासून परिसरात त्या दिवशी बॅरिकेड्स लावून इतर मार्गांवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी पाणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
बंदोबस्तासाठी योग्य ते नियोजन करा
मतमोजणी केंद्राच्या बंदोबस्तासाठी योग्य ते नियोजन करावे तसेच पार्किंग व वाहनांची तपासणी करून आत वाहने सोडण्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. मतमोजणी अत्यंत सुरळीत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी अधिकाऱयांनी लक्ष द्यावे, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
मतदान झाल्यानंतर सर्व मतपेटय़ा आरपीडी महाविद्यालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर 2 मे रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यावेळी मतमोजणीसाठी किती टेबल असावेत याबाबत निवडणूक अधिकारी व कर्मचाऱयांशी चर्चा करून ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी पाहणी करताना या सर्व अधिकाऱयांसह अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी अशोक तेली, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
23 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू
पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक कामांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे, तर 30 मार्च अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. 31 मार्च रोजी अर्ज छाननी होणार असून 3 एप्रिल अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख राहणार आहे. 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
18 लाख 11 हजार 642 मतदार बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 18 लाख 11 हजार 642 मतदार आहेत. त्यामध्ये 9 लाख 10 हजार 151 पुरुष तर 9 लाख 1 हजार 433 महिला मतदार व इतर 58 असे मतदार आहेत. या निवडणुकीसाठी 2 हजार 64 मतदान केंद्रे करण्यात येणार आहेत. बेळगाव लोकसभा मतदार संघामध्ये गोकाक, बैलहोंगल, अरभावी, रामदुर्ग, सौंदत्ती, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण या मतदार संघांचा समावेश असणार आहे.