वार्ताहर / सांबरा
मुतगे येथे युवतीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रद्धा सिद्धाप्पा पाटील (वय 21, रा. शिवाजीनगर मुतगे) असे तिचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रद्धा हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यानंतर ती गेल्या दोन वर्षांपासून घरीच होती. तिचे वडील माजी सैनिक आहेत व आईला पाच-सहा वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रासले आहे. श्रद्धा कॉलेजनंतर नोकरीच्या प्रयत्नात होती. नोकरी न मिळाल्याने व आईच्या आजारामुळे अस्वस्थ होऊन तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान कुटुंबीयांसह चहा घेतल्यानंतर ती आपल्या खोलीमध्ये गेली. आतून कडी लावून ओढणीने गळफास घेतला. बराच उशीर झाला तरी ती बाहेर न आल्याने तिच्या लहान बहिणीने आरडाओरड केली. यावेळी शेजाऱयांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ व आजी असा परिवार आहे.