बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि त्यांचे खासदार भाऊ डी. के. सुरेश यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित १४ ठिकाणी सोमवारी सीबीआयने छापेमारी करून चौकशी केली. या प्रकरणी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून सीबीआयने केलेल्या कारवाईची निंदा करत भाजप नेहमीच सुडाचे राजकारण करत आहे. तसेच लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी छापेमारी केली आहे. डी. के. शिवकुमार यांच्या घरी सीबीआयने केलेली कारवाई पोटनिवडणुकीसाठी पक्षाने केलेली तयारी आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा हा आणखी एक प्रयत्न असल्याचे म्हंटले आहे.
त्याचबरोबर कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून सीबीआय ही सरकारची कठपुतळी आहे. तसेच येडियुरप्पा सरकारच्या भ्रष्टाचाराची सीबीआयने चौकशी करावी. मोदी सरकारच्या या डावपेचांवर कॉंग्रेसचे कार्यकर्ते अडखळणार नाहीत, अशा कृतीतून आपण बळकट होऊ असे म्हंटले आहे.