प्रतिनिधी/ मडगाव
मडगावकरांना लोकाभिमुख तसेच गतिमान प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आग्नेलो फर्नांडिस यांनी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पालिका हे सार्वजनिक कार्यालय असून कामानिमित्त येथे आमजनता वरचेवर भेट देत असते. आपले काम लवकरात लवकर व्हावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्याअनुषंगाने कायद्याच्या चौकटीत राहून लोकांचे कामे गतीने व्हावीत यासाठी प्रशासन जाग्यावर घालण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
लोकाभिमुख प्रशासन देण्याकडे आपला कल राहील. त्यासाठी आपणास जनतेकडूनही तेवढेच सहकार्य मिळण्याची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्याधिकारी म्हणून मडगाव पालिकेचा ताबा घेतलेल्या फर्नांडिस यांना पालिकेसारख्या सार्वजनिक कार्यालयात काम करण्याचा मोठा अनुभव असून यापूर्वी कुडचडे, सांगे, कुंकळ्ळी, मुरगाव तसेच काणकोण पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी कामकाज हाताळले आहे. असे असले, तरी मडगाव पालिकेची स्थिती जाग्यावर घालणे म्हणजे मोठा डोंगरच सर करण्याचे काम त्यांच्यावर पडणार आहे.
कचरा समस्या जाग्यावर घालावी लागणार
सर्वप्रथम कचरा समस्या जाग्यावर घालावी लागणार आहे. सात महिन्यांपूर्वी फोमेन्तोकडून सोनसडय़ाचा ताबा घेतल्यानंतर पालिकेला कोणतीही सुधारणा करणे शक्मय झालेले नाही, वरून स्थिती बिघडलेली आहे. मंडळाने सात बायोमिथेनेशन लघुप्रकल्प उभारण्यासाठी ठराव घेऊन मंजुरी दिली आहे. यासंदर्भात आवश्यक पाठपुरावा फर्नांडिस यांना करावा लागेल.
पालिकेला कोविडच्या पार्श्वभूमीवर महसूलप्राप्तीसाठी झगडावे लागत असून मागील दोन महिने कर्मचाऱयांचे वेतन कायम ठेवी अकाली मोडून फेडावे लागले आहे. यामुळे वसुलीसाठी पावले उचलावी लागणार आहेत. मडगावातील रखडलेला नियोजित पार्किंग प्रकल्प उभा राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच पालिका निवडणुका होणार असल्याने स्थानिक राजकारणाला मुख्याधिकाऱयांना सामोरे जावे लागेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.