प्रतिनिधी/ पणजी
राज्यात सोमवारी कोरोनाचे चार बळी गेले असून एकूण बळींची संख्या 460 झाली आहे. काल 423 जणांनी कोरोनावर मात केली तर 391 जणांना कोरोनाची बाधा झाली. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 4803 झाली आहे. संशयित रुग्ण म्हणून 67 जणांना गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे, तर 308 जणांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत 35,719 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 30,456 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गोमेकॉतील दोन डॉक्टर्सना पुन्हा लागण
कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर्सना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे. असा प्रकार गोव्यात प्रथमच झाल्याचे दिसून येते. यातील एका डॉक्टरला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले तर दुसऱयाला त्याच्या संमतीने गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
शाळा, कॉलेजबाबात अंतिम निर्णय नाही : मुख्यमंत्री
कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने शाळा, कॉलेज सुरू करण्याचा कोणताही अंतिम निर्णय सरकारने घेतला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असेपर्यंत कोणतेही कोविड सेंटर बंद करण्यात येणार नाही. ते सुरूच राहणार असून रुग्ण तेथे राहू शकतात, असा खुलासाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.