निवडणूक आयोगाकडून नाव देखील प्राप्त
वृत्तसंस्था / पाटणा
लोकजनशक्ती पक्षाच्या (लोजप) ‘बंगल्या’तून बाहेर काढण्यात आलेल्या पक्षाच्या दोन्ही गटांना आता नवे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. हे दोन्ही गट बिहार पोटनिवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत. चिराग पासवान यांचा गट ‘हेलिकॉप्टर’ने उड्डाण करणार आहे. तर पशूपति पारस यांचा पक्ष ‘शिवणयंत्रा’द्वारे जातीय समीकरणांना जुळविणार आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे दोन्ही गट आता विविध नावांनी ओळखले जातील. चिराग पासवानांचा गट लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) या नावाने ओळखला जाणार आहे. तर पशुपति पारस यांच्या नेतृत्वाखालील गट राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष या नावाने ओळखण्यात येईल.
निवडण्डूक आयोगाने चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) याला हेलिकॉप्टर हे तर पारस यांच्या पक्षाला शिवणयंत्र हे निवडणूक चिन्ह प्रदान केले आहे. हे दोन्ही गट आता नवे नाव आणि चिन्हासह पहिल्यांदाच पोटनिवडणुकीच्या मैदानात परस्परांना भिडणार आहेत.
निवडणूक आयोगाने बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयाला याची माहिती दिली आहे. तसेच कुशेश्वर स्थान आणि तारापूर मतदारसंघात पोटनिवडणूक करविणाऱया रिटर्निंग ऑफिसर्सना दोन्ही गटांच्या उमेदवारांना मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचे उमेदवार म्हणून मानले जावे असे कळविले आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे नाव आणि चिन्हावर दोन्ही गटांकडून करण्यात येणारा दावा तसेच वाद आणि बिहारमधील दोन मतदारसंघांतील पोटनिवडणूक पाहता मागील आठवडय़ात निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आयोगाने लोकजनशक्ती पक्षाचे नाव आणि बंगला हे चिन्ह गोटवून दोन्ही गटांना स्वतःची पसंती तसेच प्राथमिकता सांगण्याची सूचना केली होती. दोन्ही गटांनी सोमवारी स्वतःची भूमिका मांडली आणि मंगळवारी आयोगाने दोनही गटांना नवे नाव आणि चिन्ह प्रदान केले आहे.