रस्ते दुर्घटनेप्रकरणी त्वरित मदतीसाठी योजना – वाहतूक मंत्रालयाचा उपक्रम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते दुर्घटनेतील जखमींना गोल्डन ऑवर म्हणजेच एका तासात रुग्णालयात पोहोचविणाऱया व्यक्तीला 5 हजार रुपयांचे इनाम देण्याची योजना सुरू केली आहे. ही योजना रस्ते दुर्घटनेत होणाऱया मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सादर झाली असून 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि वाहतूक सचिवांना योजनेशी संबंधित पत्र पाठविले आहे.
रस्ते दुर्घटनेत जखमी झालेल्यांना एका तासात रुग्णालयात पोहोचविल्यास बळींचा आकडा मोठय़ा प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. देशात दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा रस्ते दुर्घटनांमध्ये मृत्यू होतो.
मंत्रालयाने ‘नेक मददगार को पुरस्कार’ (चांगल्या हेतूने मदत करणारे) देण्याच्या योजनेशी संबंधित दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. रस्ते दुर्घटनांमधील जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचविणे हा या योजनेचा उद्देश आहे. मंत्रालयानुसार इनामाच्या रकमेसह एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर 10 ‘सबसे नेक मददगारां’ना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.
योजनेसाठी एक स्वतंत्र खाते उघडून त्याचा तपशील पाठविण्यात यावा असा निर्देश रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. मंत्रालयाकडून 5 लाख रुपये संबंधित राज्यांना या खात्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत.
या योजनेमुळे रस्ते दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला कुठल्याही भीतीशिवाय रुग्णालयात पोहोचविता येणार आहे. तसेच प्रसंगावधानता दाखविल्याप्रकरणी सरकारकडून बक्षीसही मिळणार आहे. याचबरोबर मंत्रालय एक नवे पोर्टल देखील सुरू करणार आहे. या पोर्टलवर दर महिन्याला जखमींना मदत करणाऱया व्यक्तींचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक तसेच घटनेची माहिती नोंदविली जाणार आहे. ही माहिती स्थानिक पोलीस किंवा रुग्णालय-ट्रामा सेंटर कर्मचारी देखील पोर्टलवर अपलोड करू शकतील.
देशातील रस्ते दुर्घटना अन् बळींची संख्या
वर्ष दुर्घटना बळी जखमी
2015 5,01,423 1,46,133 5,00,279
2016 4,80,652 1,50,785 4,94,624
2017 4,64,910 1,47,913 4,70,975
2018 4,67,044 1,51,417 4,69,418