प्रतिनिधी/ मडगाव
मडगावातील ऐतिहासिक लोहिया मैदानाची परवड चालूच असल्याचे वृत्त तरुण भारतने सोमवारी प्रसिद्ध केल्यानंतर मडगाव पालिकेला खडबडून जाग आली व पालिकेकडून सर्वप्रथम स्मारकाच्या शेजारी पडून असलेला कचरा तत्काळ उचलण्यात आला.
मात्र पालिकेकडून येथे खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून त्यांचे वेतन पालिकेकडून फेडण्यात येत असते. प्रत्यक्षात येथे सुरक्षा रक्षक उपस्थित राहतच नसल्याचे आढळून येत आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्याशी विचारणा केली असता, आपण सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली असून त्याने तेथे सेवा बजावत असल्याचे सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले. पण मंगळवारी सायंकाळी तीनच्या सुमारास तरुण भारतच्या छायाचित्रकाराने येथे भेट दिली असता सुरक्षा रक्षक तर उपस्थित नव्हताच, शिवाय व्यासपीठावर तसेच इतरत्र चार -पाच बेवारशी लोक वामकुक्षी घेत असल्याचे त्याला आढळून आले.
मुख्याधिकाऱयांच्या नजरेस हा प्रकार आणून दिल्यानंतर त्यांनी यासंदर्भात संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. ऐतिहासिक लोहिया मैदानाच्या पवित्रतेला बाधा पोहोचविण्यात येत असल्याचे नजरेस आणून दिल्यानंतर पालिकेने तेवढय़ाच कठोरपणे पावले उचलणे गरजेचे असून मुख्याधिकाऱयांसह प्रशासक प्रसन्न आचार्य यांनीही यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.