परवानगी नसल्याचे कारण, जीत आरोलकरांचा समर्थकांसह रस्त्यातवरच मगोत प्रवेश
मोरजी / प्रतिनिधी
मांदेचे युवा उद्योजक जीत आरोलकर यांना मगो पक्षात प्रवेश देण्यासाठी मांद्रे हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेली सभा पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण सांगून उधळली. पोलिसांनी सभेस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता परंतु जीत आरोलकर व त्यांच्या समर्थकांनी तेथील रस्त्यावरच मगो पक्षाचे नेतेमाजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांच्या उपस्थित मगो पक्षात प्रवेश केला.
सोमवारी 16 रोजी सभा आयोजित करण्यासाठी संबंधितांनी आठ दिवसापूर्वी पेडणे उपजिल्हाधिकाऱयांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र उपजिल्हाधिकारी रवीशेखर निपाणीकर यांनी 16 रोजी सायंकाळी साडे तीन वाजता सभेला परवानगी नाकारल्याचे आयोजकांना कळवले. सभेच्या ठिकाणी दुपारी 3 वाजल्यापासूनच मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परवानगी नसल्याच्या कारणावरून पोलिसांनी सभा घेण्यास मज्जाव केला. सभा उधळल्यामुळे मगोच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला. संतप्त कार्यकर्त्यांनी येथे असलेल्या संयुक्त मामलेदार गौतमी पर्मेरकर, संयुक्त मामलेदार सौ. कामत व पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. भाजपच्या सभांना कायदा लागत नाही का ? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेकडो कार्यकर्त्यांची सभा घेऊ शकतात. त्या सभेला सरकारने परवानगी दिली होती का ? असे अनेक प्रश्न अधिकाऱयांना विचारण्यात आले. मगो नेते केतन भाटीकर यांनी पोलीस निरीक्षक दळवी यांना प्रश्न करून निरुत्तर केले होते.
यावेळी जीत आरोलकर यांच्यासोबत मांदेचे सरपंच आम्रोज फर्नाडिस, पंचसदस्य अस्वेता मांदेकर, पंचसदस्य सुभाष आसोलकर, किशोर नाईक, तेरेखोल पंचसदस्य आग्नेल फर्नाडिस, माजी पोलीस अधिकारी नारायण उर्फ नाना सोपटे केरकर, पंचसदस्य गुणाजी ठाकूर आदींनी माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर, प्रवीण आर्लेकर, श्रीधर मांजरेकर यांच्या उपस्थितीत मगोत प्रवेश केला.
परवानगी नाकराण्याचा पूर्वनियोजित कट ?
मगोची सभा 16 रोजी आयोजित केली होती. त्यासाठी पंचायत आणि हायस्कूलच्या मैदानाची परवानगी घेतली होती. या सभेत श्री. आरोलकर हजारो समर्थाकांसहित होते. या सभेच्या परवानगीसाठी आठ दिवसापूर्वी अर्ज केला होता, दरदिवशी त्याचा पाठपुरवा केला जात होता. सभेदिवशी दुपारी 12 वाजता श्री. आरोलकर यांचे समर्थक उपजिल्हाधिकारी कार्यालयात गेले असताना त्यांना परवानगीसाठी झुलवत ठेऊन साडे तीन वाजता परवानगी नाकारल्याचे पत्र त्याच्या हाती देण्यात आले व सभेस्थळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला. त्यामुळे परवानगी नाकारणे हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप होत आहे.
चोपडेपासून ते मांदेपर्यंत आणि केरीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मगो पक्षाते झेंडे, पताका, फलक लावण्यात आले होते. वीज खांबवही मगोमय झाले होते. त्यासाठी वीज अभियंत्यांची परवानगीही घेतली गेली होती मात्र सांयकाळी वीज कर्मचाऱयांनी खांबावरील झेंडे हटविले.
एकाचे एकवीस आमदार करू : सुदीन ढवळीकर
सध्या मगोचा एक आमदार आहे त्याचे आता 21 आमदार करायला वेळ लागणार नाही. मगोच्या पक्ष प्रवेशाला सरकार परवानगी नाकारते तर मग नरकासुराला परवानगी कशी काय देतो ? असा प्रश्न आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले यांनी केला. मगोचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी जीत आरोलकर यांचा प्रवेश मांद्रेतून शुभ संकेत घेऊन येत आहे, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सरकारच्या कृतीचा निषेध केला.
गोव्यात आणीबाणी आली का ?
मगोत प्रवेशाला परवानगी नाकारल्याने गोव्यात आणीबाणी लागू केली की काय ? प्रश्न आमदार ढवळीकर यांनी उपस्थित केला. 200 लोकांचा कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला. मात्र नरकासुराला सरकारने परवानगी दिली. हजारो लोक एकत्र आले. त्यांच्यावर उत्तर गोवा किंवा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. परवानगी का नाकारली याबाबत उपजिल्हाधिकारी यांना विचारले असता तर कार्यकर्त्यांच्या नावांचा उल्लेख नसल्याने परवानगी नाकारल्याचे सांगितले. ही कृती योग्य नसल्याचे आमदार ढवळीकर म्हणाले. मगो पक्षात हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार होते मात्र सरकारने लोकशाहीचा खून केला.
पोलीस अगोदरच कसे पोहोचले ?
साडेतीन पर्यंत आम्हाला परवानगी दिली नव्हती. असे असताना पोलीस त्यापूर्वीच पोलीस फौजफाटा घेऊन सभेस्थळी कसे पोहोचला असा प्रश्न आमदार ढवळीकर यांनी केला. पोलिसांना अगोदरच परवानगी नाकारली ते कसे कळले ? याचा खुलासा त्यांनी पत्रकारांसमोर करावा, अशी मागणी केली असता अधिकारी निरुत्तर झाले.
माझी ‘जीत’ निश्चित : जीत आरोलकर
जीत आरोलकर यांनी या प्रकारचा निषेध करून आपल्या मगो प्रवेशाला आडकाठी आणणे म्हणजे मगोची ताकद समजली आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून येते. विरोधकांनी निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे. मांदेच्या व पेडणेच्या आमदारांनी अधिकाऱयांवर दबाव आणून परवानगी नाकारली. सभा नाकारली मात्र ते त्यांचा पराभव नाकारू शकत नाहीत, असे श्री. आरोलकर यावेळी म्हणाले.
प्रवेश नाटय़ संपल्यानंतर सुमारे एक किलोमीटर पायी चालत मगोच्या नेत्यासहित समर्थकांनी माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केले
हा तर लोकशाहीचा खून
देवेंद्र प्रभू देसाई म्हणाले की, सरकारने लोकशाहीचा खून केला आहे. पोर्तुगीज ‘सालाझारशाही’ परवडली. या हिटलरशाहीला जनताच लगाम घालणार आहे. जीत आरोलकर मगो पक्षात प्रवेश करणार ही भीती स्थानिक आमदारांना होती म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्यामार्फत परवानगी सभेला नाकारली. आमदार दयानंद सोपटे यांच्या पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांनी सभा उधळली.