पोलीस, वन विभागाची कारवाई : दोघा जणांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
वन्यप्राणी, पक्ष्यांची तस्करी करणाऱयांविरुद्ध पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी कारवाई तीव्र केली आहे. कासव, माकड, दुतोंडी साप, तितर, भेकर, हरिण, खवल्या मांजरापाठोपाठ आता हस्तीदंताची तस्करी करणाऱया एका टोळीचा छडा लावण्यात आला आहे. वंटमुरीजवळ दोघा जणांना अटक करून सात हस्तीदंत जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस वन विभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार आर. बी. यरनाळ, एस. आर. अरिबेंची, के. डी. हिरेमठ, जिपचालक बी. बी. इंगळगी आदींनी शनिवारी ही कारवाई केली असून 2 हजार 430 ग्रॅम वजनाचे सात हस्तीदंत जप्त करण्यात आले आहेत. त्यांची विक्री करण्यासाठी निघालेल्या जोडगोळीला अटक करण्यात आली आहे.
लगमाप्पा यल्लाप्पा नाईक (वय 26, रा. गुटगुद्दी, ता. हुक्केरी), मल्लाप्पा बाळाप्पा धुळाप्पगोळ (वय 38, रा. मार्कंडेयनगर, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत. त्यांच्यावर वन्यजीवी संरक्षण कायदा 1972, कलम 9, 39, 44, 51 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास आता वनविभागाच्या अधिकाऱयांकडे सोपविण्यात आला आहे. वंटमुरीजवळ असलेल्या कमानीनजीक लगमप्पा व मल्लाप्पा यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ सात हस्तीदंत आढळून आले. हे हस्तीदंत या जोडगोळीने कोठून आणले? याचा तपास करण्यात येत आहे.
हस्तीदंतासाठी हत्तींची शिकार करण्यात आली की, कोणी तरी शिकार करून ते विक्रीसाठी या जोडगोळीकडे दिले आहेत? याचा उलगडा झाला नाही. प्रत्येक हस्तीदंताचे वजन आणि लांबी-रुंदी वेगळी आहे. पोलिसांनी सर्व सात हस्तीदंतांचे वजन केले असता 2 हजार 430 ग्रॅम इतके झाले असून नेमकी विक्री कोणाला केली जाणार होती, याचाही उलगडा झाला नाही.
किंमत कशी ठरवणार?
शनिवारी जप्त करण्यात आलेल्या सात हस्तीदंतांची किंमत किती होते? यासंबंधी वन विभागाच्या अधिकाऱयांकडे विचारणा केली असता हस्तीदंतांची खरेदी आणि विक्री करणे गैर आहे. त्यामुळे त्यांची किंमत करता येणार नाही. पोलीस वन विभागाच्या अधिकाऱयांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी वन विभागाकडे सोपविले आहे. या खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व हस्तीदंत सुरक्षित ठेवले जातात. निकालानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांची विल्हेवाट लावली जाते. हस्तीदंत, वाघनखे, वाघ व इतर प्राण्यांची कातडी विकणे, खरेदी करणे गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे वनखात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.