शहापूर -खडेबाजार, काँग्रेस रोड, खानापूर रोड, महात्मा फुले रोडचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील प्रत्येक रस्त्यावर फेरीवाल्यांसाठी महापालिकेच्यावतीने हॉकर्स झोन जाहीर करण्यात आले असून नरगुंदकर भावे चौक आणि शहापूर दाणे गल्ली येथील खुल्या जागेला हॉकर्स झोनचा दर्जा देण्यात आला आहे. एसपीएम रोड, खडेबाजार-शहापूर ते येळ्ळूर क्रॉसपर्यंतचा रस्ता, काँग्रेस रोड, खानापूर रोड, श्रीनगर डबल रोड, महात्मा फुले रोडसह दहा रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसाय थाटण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बाजारपेठेतील प्रत्येक रस्त्यावर दुतर्फा भाजी विपेते, फळ विपेते, कपडे विपेते त्या व्यतिरिक्त विविध साहित्य विकणाऱया फेरीवाल्यांची गर्दी मोठय़ा प्रमाणात आहे. आता शहर आणि उपनगरांतील प्रत्येक रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी वाढू लागली आहे. खडेबाजार शहापूर, अनगोळ नाका, कणबर्गी रोड, खानापूर रोड, तसेच विविध भागातील रस्त्यांशेजारी फेरीवाल्यांची गर्दी होत आहे. परिणामी रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
फेरीवाल्यांमुळे वादावादी, वाहतूक कोंडी
बाजारपेठेतील फेरीवाल्यांमुळे वादावादी आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी सातत्याने होत असते. मात्र, फेरीवाल्यांवर कारवाई न करता त्यांचे संरक्षण करण्याचा कायदा केंद्र शासनाने अंमलात आणला आहे. फेरीवाल्यांना हटविण्याऐवजी खुल्या जागेमध्ये फेरीवाला झोन निर्माण करून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून फेरीवाला झोन निर्माण करण्यासाठी महापालिका जागेच्या शोधात आहे. पण महापालिकेला जागा मिळाली नसल्याने फेरीवाला झोनचा प्रस्ताव बासनात पडला होता. पण अलीकडेच महापालिकेने हॉकर्स झोन आणि नॉन-हॉकर्स झोनची घोषणा केली आहे. नरगुंदकर भावे चौक आणि दाणे गल्ली येथे महापालिकेच्या खुल्या जागा असून भाजी विक्रीसह विविध व्यवसाय करण्यासाठी सदर जागा योग्य आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी योग्य असून पिण्याच्या पाण्याची सोय आहे. वाहतुकीस अडथळा होत नसल्याने दोन्ही जागांना हॉकर्स झोनचा दर्जा देण्यात आला असल्याचे महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
शहापूर बाजारपेठेतील मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया खडेबाजार रस्त्यावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एसपीएम रोडपासून शहापूर खडेबाजार ते बॅ. नाथ पै चौकापासून येळ्ळूर क्रॉसपर्यंतचा रस्ता नॉन-हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. शिवाजी उद्यानापासून बसवेश्वर चौकापर्यंतचा महात्मा फुले रोड, टिळकवाडीतील देशमुख रोड, हरिमंदिर समोरील अनगोळ मुख्य रस्ता, महांतेशनगर येथील मुख्य रस्ता, न्याय मार्ग ते धर्मनाथ चौकपर्यंत आणि श्रीनगर उड्डाणपुलापर्यंतचा रस्ता, बसवेश्वर उड्डाणपूल ते तिसरे रेल्वे गेटपर्यंतचा खानापूर रोड, काँग्रेस रोड, अशोकनगर डबल रोड ते अशोकनगर समुदाय भवनजवळचा पादचारी रस्ता आणि न्याय मार्ग ते वीरभद्र चौकपर्यंतपासून धर्मनाथ चौकापर्यंतचा रस्ता नॉन-हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
शहरातील काही रस्ते अरुंद असून काही रस्ते मुख्य असल्याने वाहतूक मोठय़ा प्रमाणात आहे. फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्मयता असल्याने दहा रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. फेरीवाल्यांसाठी हॉकर्स आणि नॉन-हॉकर्स झोनची घोषणा करून याबाबत कोणतीही हरकत असल्यास महापालिका आयुक्तांकडे पंधरा दिवसांच्या आत लेखी तक्रार करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.
शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांसाठी वेळेचे बंधन घालण्यात येणार आहे. काही गल्ल्या व रस्त्यांना नॉन फेरीवाला झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून व्यवसाय परवानगी घेणे बंधनकारक आहे. व्यवसायाच्या ठिकाणी ओळखपत्र घालणे बंधनकारक असून महापालिका आणि रहदारी पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याची नियमावली तयार करण्यात आली आहे.