रामदेव गल्लीतील व्यावसायिक-वाहनचालकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
रामदेव गल्लीमध्ये वनवे करण्यात आला आहे. मात्र आता या रस्त्यावरून विरुद्ध बाजूनेही दुचाकीस्वार वाहन चालवत आहेत. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालून वनवेमधून येणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिकांतून आणि वाहनचालकांतून होत आहे.
रामदेव गल्ली ही सतत गजबजलेली असते. किर्लोस्कर रोड तसेच मारुती गल्लीकडून येणारी वाहने समादेवी गल्लीकडे येण्यासाठी परवानगी आहे. मात्र समादेवी गल्लीकडून तसेच इतर गल्ल्यांतून रामदेव गल्लीमधून किर्लोस्कर रोड आणि मारुती गल्लीकडे जाण्यास बंदी आहे. पण अनेक दुचाकीस्वार उलट दिशेनेच वाहने चालवत आहेत. अपघात घडण्याची शक्यता आहे.
सध्या ही गल्ली अरुंद आहे. यातच एखादे वाहन रस्त्यावरच पार्किंग केले तर बऱ्याचवेळा वाहतुकीची केंडी होत आहे. अशावेळीदेखील वनवेमधून दुचाकीस्वार विरुद्ध दिशेनेच जात आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा वादावादीही होत आहे. वाहनचालक उद्धट उत्तरेही देत आहेत. तुम्ही पोलीस आहात का? अशी उत्तरे बऱ्याचवेळा देत आहेत. तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी थांबून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मोठी वाहतूक कोंडी
दुचाकीबरोबरच आता रिक्षाचालकही या गल्लीमधून वाहने चालवित असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. उलट दिशेने वाहने येत असल्याने समस्या निर्माण होत आहे. यातच काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. तेव्हा याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.