ऑनलाईन टीम / मुंबई :
एकीकडे महाराष्ट्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे दुर्घटना घडत आहे. त्यातच मुंबईतील वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळीच्या हनुमान गल्लीत लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ललित अंबिका या इमारतीमधील बिल्डिंगमध्ये लिफ्ट कोसळल्याने झालेल्या घटनेत एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या इमारतीच्या लिफ्टमध्ये एकुण सहा जण होते. लिफ्ट कोसळल्याची घटना घडल्यानंतर एकुण 4 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. वरळीतील एन एन जोशी हद्दीत सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेतील आकडा आणखी वाढण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून 4 जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे.