172 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचला वेग : प्रवास जलद होणार
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या वर्जिन हायपरलूप या कंपनीने स्वतःच्या हायस्पीड पॉड सिस्टीमची प्रवाशांसोबत पहिली चाचणी केली आहे. या प्रवासात वर्जिन हायपरलुपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोश गेगल आणि संचालक सारा लुचियन यांनीही भाग घेतला आहे. पॉडचा कमाल वेग 172 किलोमीटर प्रतितास राहिला आहे. ही चाचणी अमेरिकेच्या नेवादा प्रांतातील लॉस वेगासमध्ये तयार करण्यात आलेल्या केंद्रात झाली आहे.
लॉस एंजिलिस येथील कंपनी हायपरलूपने भविष्यासाठी पॉडआधारित रेल्वेयंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा एका निर्वात टय़ूबसिस्टीमवर संचालित होते. याचा कमाल वेग 966 किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक असू शकतो. पहिल्या प्रवासी चाचणीवेळी हायपरलूपचे अध्यक्ष सुल्तान अहमद बिन सुलेयम यांनी माझ्या डोळय़ांसमोर इतिहास रचला जात असताना पाहिल्याचे उद्गार काढले आहेत.
दीर्घकाळापासून होतेय परीक्षण
वर्जिन हायपरलूप स्वतःच्या पॉड आधारित प्रवासी यंत्रणेची दीर्घकाळापासून चाचणी करत आहे. नेवादा येथील केंद्रावर प्रवाशांशिवाय याच्या सुमारे 400 चाचण्या पार पडल्या आहेत. अमेरिकेत सर्वप्रथम न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनदरम्यान हायपरलूप रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या यंत्रणेद्वारे वॉशिंग्टन ते न्यूयॉर्कमधील प्रवास केवळ 30 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. ही पॉड यंत्रणा विमानापेक्षा दुप्पट आणि हायस्पीड ट्रेनपेक्षा 4 पट अधिक वेगवान आहे.
2030 पर्यंत धावू लागणार
कंपनी या यंत्रणेवर वेगाने काम करत आहे. 2025 पर्यंत सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्यास कंपनी यशस्वी ठरू शकते. 2030 पर्यंत अमेरिकेत पहिली हायपरलूप रेल्वे चालविण्याची योजना आहे. कॅनडाचा ट्रान्सपॉड आणि स्पेनचा जेलेरोसही हायपरलूपच्या धर्तीवर वेगवान प्रवास यंत्रणा विकसित करत आहे.
भारतातही प्रकल्प
प्रवास सुलभ आणि लवकर पूर्ण करण्यासाठी भारतातही अनेक मार्गांवर हायपरलूप रेल्वे चालविण्याची योजना आखली जात आहे. यात मुंबई-पुणे, बेंगळूर शहर ते विमानतळ, अमृतसर ते चंदीगढ, भोपाळ-इंदोर-जबलपूर मार्ग सामील आहे.
हायपरलूप पॉडचे कार्यस्वरुप
हायपरलूप पॉडला विशेष टय़ूब्स किंवा भुयारांमधून चालविण्यात यावे. या टय़ूब्स किंवा भुयारांमधून हवा पूर्णपणे बाहेर (वॅक्यूम) काढून घर्षण टाळण्यात येते. घर्षण वेग कमी करत असल्याच्या त्याच्या अनुपस्थितीत हा पॉड 1200 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने प्रवास करू शकणार आहे. या पॉड्सला चाके नसतात आणि ते पोकळीत तरंगत पुढे सरकतात.