7 हजार 500 विमानांची ये-जा, भविष्यात प्रवाशांची संख्या वाढण्याचा विश्वास
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेतही बेळगाव विमानतळाने दमदार कामगिरी करुन दाखविली आहे. एकीकडे देशातील इतर विमानतळ उड्डाणांविना बंद होती तर दुसरीकडे बेळगाव विमानतळावरुन प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. 2021 या वर्षभराच्या कालावधीत तब्बल 3 लाख 11 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे झाली आहे.
देशातील एक प्रमुख विमानतळ म्हणून बेळगाव विमानतळाकडे पाहिले जाते. देशाच्या राजधानीसह इतर प्रमुख शहरांना येथून विमान कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे. यामुळेच प्रवाशांची संख्या कमालीची वाढत आहे. कोरोनामुळे आरटीपीसीआरचे निर्बंध असतानाही प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सध्या आरटीपीसीआरचे निर्बंध हटविल्यामुळे प्रवासी संख्या दुपटीने वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विमानतळावरुन बेंगळूर, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, तिरुपती, पुणे, अहमदाबाद, इंदूर, नाशिक, सुरत, जोधपूर या शहरांना विमानसेवा सुरू आहे. उडान-3 अंतर्गत बेळगावचा समावेश झाल्यापासून सर्वसामान्यांनाही विमानप्रवास सोयीचा ठरला आहे. यामुळेच प्रवासी संख्या झपाटय़ाने वाढत गेली. एप्रिल, मे च्या काळात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली होती. परंतु त्यानंतर मात्र 30 हजारांच्या घरात संख्या पोहोचली.
7 हजार विमानांच्या फेऱया
बेळगाव विमानतळावरुन स्पाईसजेट, इंडीगो, स्टारएअर व अलायन्सएअर या विमान कंपन्या सेवा देत आहेत. तर ट्रुजेट देखील सप्टेंबरपर्यंत बेळगावमधून सेवा देत होती. वर्षभरात 7 हजार 518 विमानांची ये-जा होती. थ्री टायर शहरांमधून इतक्मया मोठय़ा प्रमाणात विमानांची ये-जा असणारे बेळगाव विमानतळ हे देशात अव्वल ठरले आहे. जर कोरोनाची परिस्थिती नसती तर 10 हजारांची संख्या गाठली असती, असा विश्वास अधिकारीवर्गाने व्यक्त
केला.
आणखी काही शहरांना विमानसेवा सुरू करणार – राजेशकुमार मौर्य (संचालक बेळगाव विमानतळ)
मागील वषीच्या तुलनेत यावषी प्रवासी संख्या वाढली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांची वाहतूक वाढली आहे. वर्षभरात 3 लाख 11 हजार प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरुन प्रवास केला आहे. भविष्यात अजून काही शहरांना विमान सेवा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
2021 सालातील कामगिरी
महिना | प्रवासी संख्या | विमानांची ये-जा |
जानेवारी | 36471 | 769 |
फेब्रुवारी | 34940 | 662 |
मार्च | 30819 | 744 |
एप्रिल | 21899 | 636 |
मे | 11271 | 492 |
जून | 18020 | 512 |
जुलै | 21881 | 618 |
ऑगस्ट | 24725 | 658 |
सप्टेंबर | 23872 | 533 |
ऑक्टोबर | 29372 | 566 |
नोव्हेंबर | 29008 | 510 |
डिसेंबर | 29257 | 518 |
एकूण | 311535 | 7518 |