42 विषयांवर होणार चर्चा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल वर्षभर झाली नव्हती. कोरोनामुळे प्रत्यक्ष सभा घेण्यास नगरविकास विभागाकडून परवानगी मिळत नव्हती. नगरविकास विभागाकडेही अनेकदा पत्र व्यवहार करुन प्रत्यक्ष सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. आता 3 फेब्रुवारीला शासनाच्या निर्णयानुसार ऑनलाईन सभा होणार आहे. या सभेत आवाज म्युट होण्याची भिती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. तर मीडियाला या सभेत नेमके काय झाले हे समजणार कसे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनामुळे सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेता येत नव्हती. परंतु त्यानंतर शासकीय आदेशानुसार ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देश होते. परंतु सातारा पालिकेत नेटची समस्या आहे. त्या समस्येमुळे नेटची यंत्रणा बदलली तरीही नेटची समस्या सुटली गेली नाही. तसेच एक बांधकामची, स्थायीची एकदा तहकुब करुन पुन्हा कशीतरी उरकती सभा घेतली. त्यानंतर स्वीकृतच्या निवडी ऑनलाईन पार पडल्या. ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्याकरता नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नगरविकास विभागाकडून परवानगी मिळाली नाही. पालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा दि.12 फेब्रुवारी 2020 रोजी झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. त्यामुळे सभा झाली नाही. आता मात्र, 3 फेब्रुवारीला ऑनलाईन सभा होणार आहे. या सभेत 42 विषय अजेंडयावर आहेत. हद्दवाढीतील ग्रामपंचायतीमधील जमा होणारा महसुल, ग्रामपंचायत हद्दीत खर्च करणे, ग्रेड सेपरेटरला महापुरुषांचे नाव देणे, अजिंक्यताऱयाच्या किल्याच्या रस्त्यावरील विद्युत पुरवठा सुरळीत करणे, लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱयांची रिक्त पदे भरणे, शहराच्या हद्दीतील रिक्त पदे भरणे, सातारा शहर व हद्दीतील खुल्या जागा, रस्ता दुभाजक यांचे शुभोभिकरण करणे आदी विषय घेण्यात आले आहेत. त्या विषयावर चर्चा होणार असुन सभेची तयारी सुरु आहे.