सोसाटय़ाच्या वाऱयाने अनेक ठिकाणी झाडांची पडझड : क्लब रोडवर वृद्धाचा मृत्यू, पार्किंग केलेल्या 20 दुचाकींचे मोठे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
निसर्ग केव्हा आणि कसा दणका देईल, याची शाश्वती नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वळीव पाऊस साऱयांच्याच उरात धडकी भरवत आहे. मंगळवारी तर जोरदार पाऊस आणि वाऱयाने बेळगावकरांची भंबेरी उडविली. या वळिवाने क्लब रोडवर एकाचा जीव घेतला तर सिव्हिल हॉस्पिटलसमोरील दुचाकी शोरूमसमोर पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकींवर झाड कोसळून तब्बल 20 दुचाकींचे नुकसान झाले. गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा फटका या वळिवामुळे बसला आहे. मंगळवारच्या पावसाने अक्षरशः शहर परिसराला हादरवून सोडले आहे.
एरव्ही धाडसाने पावसात भिजत जाणाऱयांनी मंगळवारच्या जोरदार वाऱयासह आगमन झालेल्या पावसामुळे जागा मिळेल तेथे वाहने पार्किंग करून सुरक्षितता पत्करली. त्याचवेळी हेस्कॉमचे निवृत्त कर्मचारी पावसातच क्लब रोडवरून काळी आमराई येथे असलेल्या आपल्या घराकडे जात असताना झाड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजय यल्लाप्पा कोल्हापुरे (वय 65, रा. काळी आमराई) असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे.
दुचाकींचा अक्षरशः चेंदामेंदा
याच दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान रोडवरील नागशांती शोरूमसमोर रांगेत पार्किंग केलेल्या दुचाकींवर झाड कोसळले. झाडाचा बुंधा मोठा असल्याने त्या दुचाकींचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. केवळ सुदैव म्हणून तेथे कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. काही नवीन, काही कर्मचाऱयांच्या तर काही दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकी होत्या. त्यामुळे मोठा फटका दुचाकीस्वारांना बसला. या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामुळे बाहेर पडण्याचे धाडस कोणीच केले नाही. या झाडाची मोठी फांदी मुख्य रस्त्यावर कोसळली होती. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अनेकांच्या गाडय़ा झाडाच्या खाली अडकल्या होत्या. मात्र पावसाच्या रुद्रावतारामुळे आपल्या दुचाकीकडे हाताश होऊन पाहण्यापलीकडे कोणीही काहीच करू शकले नाही. पाऊस कमी झाल्यानंतर अनेक जण त्या ठिकाणी आले. मात्र झाडाचा बुंधा मोठा असल्यामुळे तो हलविणे अशक्मय झाले. झाड तोडणाऱया व्यक्तीला बोलावून यंत्राद्वारे झाडाची कापणी करण्यात आली. त्यानंतर दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. मात्र त्या दुचाकी संपूर्ण खराब झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वळिवाने शहरासह ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन होत आहे. बेळगाव जिल्हय़ामध्येही पावसाने हाहाकार माजविला आहे. पावसाला जोर नसला तरी जोरदार वारा आणि विजांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. दररोज दुपारी पावसाचे जोरदार आगमन होत आहे. मंगळवारी दुपारी तर जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाल्याने साऱयांचीच तारांबळ उडाली. आडोसा शोधायचा तरी कुठे, असा प्रश्न साऱयांनाच पडला.
मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या होत्या. यामुळे बऱयाच ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या पावसामुळे विद्युतपुरवठाही वरचेवर खंडित होत होता.
जोरदार पावसामुळे रविवारपेठमध्ये पाणी तुंबून होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यामधून वाहने चालविताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार पाऊस व वाऱयामुळे वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. काही ठिकाणी गुडघाभर पाणी तुंबल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनचालकांना यामधून वाट काढताना नाकीनऊ आले. बाजारहाटसाठी आलेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविक्रेते व इतर विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल अर्धा तास झालेल्या या पावसाने भीतीचे वातावरण निर्माण केले.
बापट गल्ली येथे झाड कोसळून दुचाकीचे नुकसान
बापट गल्ली येथील ओसवाल इलेक्ट्रीकल दुकानाशेजारी असलेले झाड दुचाकीवर कोसळले. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले आहे. मंगळवार असल्यामुळे वर्दळ कमी होती. तसेच पाऊस असल्याने अनेक जण इमारतींच्या आडोशाला थांबले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
विद्युतखांब कोसळून वीजपुरवठा खंडित
जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी विद्युतखांब कोसळले. विश्वेश्वरय्यानगर रोडवर विद्युतखांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. खांब कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाऊस कमी झाल्यानंतर हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन दुरुस्तीचे काम सुरू केले होते.
अरगन तलावाजळ झाड कोसळले
बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील अरगन तलावाजवळ झाड कोसळले. पाऊस आल्याने बरेच जण आडोशाला थांबले होते. त्यावेळी नागरिक थांबलेल्या दुसऱया बाजूला हे झाड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. केवळ सुदैव म्हणून आम्ही बचावलो, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या.
शहापूर येथे रिक्षावर कोसळला फलक
शहापूर येथील सराफ गल्ली, कॉर्नरजवळ रिक्षा स्टॅण्डचा फलक येथे थांबलेल्या रिक्षावरच कोसळला. यामध्ये रिक्षाचे नुकसान झाले आहे.
विजय कोल्हापुरे यांच्या मृत्यूने हळहळ
हेस्कॉममधून निवृत्त झालेले विजय यल्लाप्पा कोल्हापुरे हे बेळगाव मातंग कॉलनी को-ऑप. सोसायटीचे चेअरमन होते. ते कामानिमित्त शहरात गेले होते. दुपारी काम आटोपून आपल्या मोटारसायकल क्रमांक केए 22 ईआर 5828 वरून घरी जात होते. क्लब रोडवरून हर्षा शोरूमच्या बाजूने असलेल्या रस्त्याने काळी आमराईकडे जात असताना तेथे असलेले झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यावेळी विद्युतताराही कोसळल्या. विजय कोल्हापुरे यांचा जागीच मृत्यू
झाला.
काही जणांनी ही घटना पाहिली. मात्र विद्युततारा कोसळल्यामुळे काय करायचे, हेच सुचेनासे झाले. शेवटी हेस्कॉमच्या कर्मचाऱयांना कळवून विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विजय यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे कोल्हापुरे परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.