प्रतिनिधी / सातारा :
वाई शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तशा तक्रारीही वाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने तपास करत असताना डीबी पथकाने तीन चोरट्यांसह एका अपल्पवयीन मुलास ताब्यात घेवून त्यांच्याकडून तीन गुन्ह्यातील चोरीचे साहित्य हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून चोरीचे आणखी गुन्हे उघकीस येण्याची शक्यता आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्यात चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तपास करत असताना गुरेबाजार झोपडपट्टीतील तीन जण व एक अल्पवयीन यांनी काही चोऱ्या केल्याची खबर डीबी पथकाला मिळाली. त्यानुसार सतिश संजय जाधव (वय-19), गणेश शंकर जाधव 22, सर्व रा.गुरेबाजार झोपडपट्टी,वाई), सुनिल विलास पवार (वय 36 रा.वेळे ता.वाई) या तिघांना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. गंगापूरी व मच्छि मार्केट वाई येथिल नविन बांधकामाच्या ठिकाणच्या 20 सेंन्ट्रींग प्लेटा, पुलाच्या नविन बांधकामाच्या ठिकाणची केबल चोरली असल्याचे कबूल केले असून त्यांनी चोरलेला सुमारे 80 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच तर्कतिर्थ शाळेमध्ये चोरीला गेलेला संगणक व साहित्यही हस्तगत केले आहे. वाई पोलीस अधिक तपास करत आहेत.