एक ही गणेश मंडळ गणपती बसवणार नाही
प्रतिनिधी/ वाई
गेल्या दोन दिवसांपासून वाई शहर व तालुक्यात वाई बंद होणार असल्याच्या अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे सोमवारी वाई शहरात गर्दी दिसत होती.दरम्यान गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याऐवजी इंजेक्शन बँक अशी संकल्पना पुढे आल्याचे समजते.दरम्यान रात्रीच्या अहवालात वाई तालुक्यातील आठ जण बाधित आढळून आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई शहरातील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती.नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.या बैठकीला उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक प्रदीप चोरगे, भारत खामकर, चरण गायकवाड, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, मुख्याधिकारी विध्या पोळ यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाची वाई शहरातील अवस्था सांगून पुढे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी मूर्ती बसवणार नाही असे सांगत कोरोनाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवण्यात येतील असे जाहीर केले त्यापैकी इंजेक्शन बँक हा उपक्रम राबविण्यात येण्यावर खल झाला.वाई शहर बंद होण्याच्या अफवा सुरू आहेत त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला.प्रशासनानाने तसे काही बंद होणार नाही असे सांगितले.दरम्यान, रात्रीच्या अहवालात वाई तालुक्यातील वाई शहरामध्ये रविवार पेठेतील न्हावी आळी 1, सुरुर 1, बेलमाची 3, जेधेवस्ती वारागडेवाडी भूईज 2, धर्मपूरी 1, कोंढवली 4बाधित आढळून आले आहेत.