प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत घरपट्टीत वाढ आणि कचरा व्यवस्थापनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरपट्टीवाढ आणि कचरा व्यवस्थापन शुल्काचा भुर्दंड कमी करावा, असे साकडे माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांना घालण्यात आले. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
महानगरपालिकेने यंदा घरपट्टीत 15 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पण 30 ते 50 टक्क्यांपर्यंत घरपट्टीत वाढ करून चलन देण्यात येत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढला असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद आहेत. तसेच शहरातील नागरिक घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत घरपट्टी वाढ करणे योग्य नाही. त्यामुळे वाढीव घरपट्टी आणि कचरा व्यवस्थापन शुल्क रद्द करण्यात यावा. तसेच पाच टक्के सवलतीची मुदत 30 जून पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिले. तसेच शुक्रवारी बेंगळूर येथे बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जगदीश शेट्टर यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके व इतर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष सिद्धनगौडा पाटील, सचिव दीपक वाघेला, माजी महापौर किरण सायनाक, शिवाजी सुंठकर, विजय मोरे, मालोजी अष्टेकर, नागेश सातेरी, सरिता पाटील, महेश नाईक, संज्योत बांदेकर, नीलिमा चव्हाण, बसवराज चिकलदिनी, माजी उपमहापौर ऍड धनराज गवळी, माजी नगरसेवक संजीव प्रभू, सादीक इनामदार आदींसह माजी नगरसेवक उपस्थित होते.