दोन्ही देश 400 हून अधिक उत्पादनांचा समावेश करणार : व्यापाराला चालना मिळणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण अमेरिका खंडातील देश असलेल्या चिलीसोबत वर्तमान प्रिफरेंशियल ट्रेड ऍग्रिमेंटच्या (पीटीए) विस्तारासाठी भारताची सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही देश या वाणिज्य करारात 400 हून अधिक नव्या उत्पादनांना व्यापारासाठी सामील करू शकतात. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना बळ देणे हा या करारामागचा उद्देश आहे.
भारत आणि चिली यांच्यात 8 मार्च 2006 रोजी पीटीए झाला होता आणि तो ऑगस्ट 2007 पासून लागू करण्यात आला होता. 2016 मध्ये या करारात वाढीव उत्पादनांना सामील करण्याच्या शक्यतांवर विचार करण्यात आला होता. सद्यकाळात या करारात 200 हून अधिक उत्पादने सामील आहेत. पीटीए अंतर्गत दोन व्यापारी भागीदार निश्चित उत्पादनांवरील आयातशुल्कात भरीव घट करतात.
लीथियम, कॉपर ओरेचा समावेश
नव्या कराराच्या अंतर्गत लीथियम आणि कॉपर ओरेला पीटीएत सामील केले जाऊ शकते. दक्षिण अमेरिका खंडात चिली हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांदरम्यान 2018-19 मध्ये 2.22 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला होता.
भारताची निर्यात
भारत चिलीला वाहतूक उपकरणे, औषधे, पॉलिस्टर फायबर यार्न, टायर आणि टय़ूब, वस्त्राsत्पादने, तयार कपडे, प्लास्टिकची सामग्री, चर्मोत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने, कृत्रिम दागिने, क्रीडासाहित्य आणि हस्तकलेच्या उत्पादनांची निर्यात करतो.
चिलीकडून होणारी आयात
भारत प्रामुख्याने चिलीकडून कॉपर ओरे, आयोडीन, कॉपर एनोड्स, कॉपर कॅथोड्स, लीथियम कार्बोनेट, मेटल स्क्रॅप, केमिकल्स, पल्प, वेस्ट पेपर, फळे, खते आणि यंत्रसामग्रीची आयात करतो.