राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द ः लवकरच होणार पोटनिवडणूक
वृत्तसंस्था/ वायनाड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केरळमधील वायनाडचा दौरा केला होता. या दौऱयावेळी त्यांच्यासोबत प्रियांका वड्रा देखील होत्या. दोघांच्याही या दौऱयानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राहुल गांधी हे वायनाडचे खासदार राहिले आहेत. राहुल यांचे संसद सदस्यत्व काही दिवसांपूर्वी अब्रूनुकसानीप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आल्याने रद्द झाले आहे. याप्रकरणी राहुल यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. या मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यास प्रियांका वड्रा या काँग्रेसच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
पुढील काही आठवडय़ांमध्ये राहुल यांना दिलासा न मिळाल्यास निवडणूक आयोगाला या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करावी लागणर आहे. अशा स्थितीत राहुल गांधी हे उमेदवार नसतील. याचमुळे पोटनिवडणुकीत प्रियांका वड्रा यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रियांका वड्रा या निवडणूक लढविणार असल्याची चर्चा मागील काही काळापासून काँग्रेसच्या वर्तुळामध्ये वेगळय़ा कारणांमुळे सुरू होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीतून त्या निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात होते. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीमुळे हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा होती.
राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागल्यावर रायबरेली मतदारसंघाविषयीची चर्चा मागे पडली आहे. राहुल गांधी हे स्वतःच्या शिक्षेवर कायदेशीर मार्ग स्वीकारण्याऐवजी लोकांमध्ये जात स्वतःची बाजू मांडण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. खासदार म्हणून प्राप्त शासकीय निवासस्थानही त्यांनी सोडले असून ते आता सोनिया गांधींच्या निवासस्थानात वास्तव्यास गेल्याचे समजते.