वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेश राज्याच्या येथील शुटींग अकादमी संकुलात सुरू असलेल्या गट 1 मधील रायफल व पिस्तूल राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत हरियाणाचा नेमबाज शिवा नरवालने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल टी 3 प्रकारात सुवर्णपदक मिळवले. तर उत्तरप्रदेशच्या नेहाने महिलांच्या विभागात या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक घेतले.
पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल टी-3 नेमबाजी प्रकारातील अंतिम लढतीत शिवा नरवालने पंजाबच्या अर्जुनसिंग चिमाचा 17-7 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. तर महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल टी-3 नेमबाजी प्रकारातील अंतिम लढतीत उत्तरप्रदेशच्या नेहाने रिदम सांगवानचा 17-9 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले.
या स्पर्धेत कनिष्ठांच्या विभागात उत्तरप्रदेशच्या उर्वा चौधरीने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल टी-3 प्रकारात हरियाणाच्या लक्षिताचा 16-10 असा पराभव करत सुवर्णपदक हस्तगत केले. कनिष्ठ पुरुषांच्या विभागात राजस्थानच्या अमित शर्माने सुवर्णपदक मिळवताना हरियाणाच्या सम्राट राणाचा 17-15 असा पराभव केला.