प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य श्रीराम मंदिर गाडेमार्ग शहापूर येथे वारकरी समुदायतर्फे वा. पु. गिंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लव महाराज, राठोड, ज्ञानेश्वर काकडे, लक्ष्मण बण्णूर, कुश नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी लव महाराज म्हणाले, वा. पु. गिंडे यांचे वडील पुरुषोत्तम यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वर समाधीच्या सानिध्यात राहून ज्ञानेश्वरी, भागवत, श्री तुकाराम गाथा या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. अनेक अध्यात्मिक गुरुंचा सहवास त्यांना लाभला. ज्ञानेश्वरी सामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही त्यांची कळकळ होती. त्यांचाच वारसा त्यांचे सुपुत्र वासुदेव गिंडे ऊर्फ वा. पु. यांनी चालविला. त्याच्या घरी दरवषी तुकाराम बीज ते नागशष्टीपर्यंत उत्सव चालतो. ज्ञानेश्वरी ही केवळ अध्यात्मिक नव्हे तर लौकिक जीवनही आनंदी करते. त्यामुळे तिचा अभ्यास आपण करावा, असे वा. पु. म्हणत. त्यांच्या निधनाने बेळगावमधील ज्ञानेश्वरीचा अभ्यासक हरपला आहे. ज्ञानेश्वर, राठोड, शारदा भेकणे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी ज्ञानेश्वरी माउली सेवा मंडळ शहापूर, वारकरी भजनी मंडळ खासबाग, क्रांती महिला भजनी मंडळ व शेखर हंडे, बाळकृष्ण नार्वेकर, परशराम मिरजकर, सुधीर कालकुंद्रीकर, रवी शिगिहळ्ळी, वैजनाथ उच्चुकर, शंकर राठोड आदी उपस्थित होते.