प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कलाकारांवरही संकट कोसळले आहे. त्यामुळे त्या कलाकारांना कन्नड आणि सांस्कृतिक खात्यातर्फे 3 हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. तरी कलाकारांनी सेवासिंधू पोर्टलद्वारे आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या कलाकारांना 3 हजार रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 19 मे रोजी केली आहे. कन्नड आणि सांस्कृतिक खात्यातर्फे हे साहाय्यधन देण्यात येणार आहे, असे खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री यांनी स्पष्ट केले आहे. या मानधनासाठी 35 वर्षांपेक्षा अधिक वय असणे गरजेचे आहे. किमान 10 वर्षे कलेची सेवा केलेली असावी, कोणतीही कला सादर करतानाचे छायाचित्र असणे बंधनकारक आहे.
कलाकार हा सरकारी नोकरदार नसावा. 2020-21 सालामधील सामान्य विशेष घटक गिरीजन उपाय योजनेंतर्गत सांस्कृतिक वादक, संघ, संस्था याद्वारे कलाचित्रकार, शिल्पकार आणि चित्रकला व अन्य कलाकार यांना अर्ज करता येतील. कलाकारांनी आपले नाव, पत्ता, कला प्रकार, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाद्वारे अर्ज दाखल करावेत. जिल्हय़ातील सर्व नागरी सेवा केंद्रामध्ये अथवा मोबाईलद्वारे, ऑनलाईन अर्ज करता येतील. 5 जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत. अधिक माहितीसाठी 0831-2474649 अथवा 9481527368 क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविले आहे