ऑनलाईन टीम / वाराणसी :
वाराणसी मधील मुस्लिम महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः च्या हातांनी बनवलेली राखी पाठवली आहे. मुस्लिम महिला फाऊंडेशनच्या प्रमुख नाजनिन अन्सारी यांच्या नेतृत्वात 2014 पासून या महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवत आहेत.
चीनकडून करण्यात देशावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून या मुस्लिम महिलांनी चीनमधून येणाऱ्या राख्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन देखील केले आहे.
मंगळवारी इंद्रेश नगर लमहीमधील सुभाष भवनमध्ये मुस्लिम महिला फाऊंडेशन आणि विशाल भारत संस्थान यांच्यातर्फे मुस्लिम महिलांनी गीत सादर करत मोदी, ट्रम्प आणि इंद्रेश यांच्या राख्या बनवल्या. त्यानंतर पोस्टाद्वारे या राख्या पंतप्रधानांना पाठवण्यात आल्या.
विशाल भारत संस्थेचे संस्थापक डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, या मुस्लिम महिला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना राखी पाठवून भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मदत करतील.