गवे लाकवस्तीत घुसल्याने तारांबळ : देसाईनगर सांखळी येथील प्रकार : वन कर्मचाऱ्यांसह स्थानिकांची दमछाक : अखेर जंगलात हाकलून लावण्यात यश
डिचोली : गव्यांच्या कळपातून दोन गवे देसाईनगर सांखळी येथील लोकवस्तीत घुसल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या गव्यांना लोकवस्तीपासून बाहेर हुसकावताना वन कर्मचारी व स्थानिकांची पुरती दमछाक झाली. सकाळी 7 वा. चालण्यासाठी गेलेल्या स्थानिकांना सदर गवे दृष्टीस पडले होते. पर्ये सत्तरी भागातून सदर गवे देसाईनगर भागात घुसल्याची माहिती त्यांनी दिली. सकाळी देसाईनगर सांखळी येथील श्री सिध्दीविनायक मंदिराच्या जवळच देवस्थानचे अध्यक्ष अशोक देसाई, नरहरी गावस व आनंद पेटकर यांना सदर गवे दृष्टीस पडले. स्थानिकांना गव्यांनी पाहताच त्या जागेवरून पळ काढत झाडीच्या दिशेने गेले. याबाबत स्थानिकांनी वन खात्याच्या केरी विभागीय कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर वनाधिकारी सेबेस्टीव्ह रॉड्रिगिस यांच्या मार्गदर्शनाखाली राऊंड फोरेस्टर प्रदीप सिनरी, यशवंत गावकर, फोरेस्ट गार्ड शेखर गावस, श्यामू वरक, रेस्कुअर फोंडू राणे, विशांत नाईक, राज माजिक, विष्णू राणे, भुवनेश राणे यांनी देसाईनगर सांखळी येथे धाव घेऊन त्यांना वस्तीबाहेर हालविण्याचे प्रयत्न केले. यावेळी स्थानिक नागरिक सदाशिव गावस, सागर पवार, अजित गावकरस, सुरेश देसाई, योगेश लवंदे, व्यंकटेश देसाई यांनी वनकर्मचाऱ्यांना सहकार्य केले. देसाईनगर परिसरातील दाट झाडीत दडून दडून बसलेल्या गव्यांना बाहेर काढणे बरेच कठीण बनले होते. मात्र दगड मारून तसेच खास यंत्राद्वारे आवाज करून या गव्यांना झाडीतून बाहेर काढण्यात आले. नंतर त्यांना हुसकावून लावण्यात यश आले. आले. त्यानंतर ते पळत जवळील जंगल परिसरात पसार झाले. लोकवस्तीच्या भागात गवे दृष्टीस पडल्याने लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.