प्रतिनिधी / कुपवाड
शासनाचा महसूल बुडवून कुपवाडमार्गे बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक करणारे नंबर प्लेट नसलेले दोन ट्रक रविवारी पहाटे पाठलाग करून पकडण्यात आले. कुपवाड पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोघा चालकांना अटक केली असून वाळू चोर मालक मात्र पसार झाले आहेत. 35 हजार रूपयांच्या वाळूसह दोन ट्रक मिळून 5 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये कृष्णदेव तुकाराम बजबळकर (30,रा. तिप्पीहळी, ता.सांगोला), नवनाथ मारुती गुळीग (36, रा. गौंडवाड़ी, ता. सांगोला) अशी अटक केलेल्या चालकांची नावे आहेत. त्यांना तीन दिवस पोलीस कोठड़ीत ठेवण्याचा आदेश रविवारी न्यायालयाने सुनावला. तर याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सचिन वाघमोड़े (रा.कुपवाड) व सतीश गौंड (रा.सावळी) हे दोघे वाळूचोर ट्रकमालक पसार झाले आहेत. त्यांनाही लवकरच अटक करणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकला नंबर प्लेट न लावता शासनाचा महसूल बुडवून सोलापूर जिह्यातून आणलेल्या वाळूची कुपवाडमार्गे चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनी नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकाने शनिवारी मध्यरात्री कुपवाड हद्दीत सापळा लावला. यावेळी एका पथकाने रात्री पावणेदोनच्या सुमारास तानंग फाटय़ावर चोरटी वाळू वाहतूक करणारा (एम.एच.09-एल.6358) एक ट्रक पाठलाग करून पकडण्यात आला. यावेळी ट्रक जप्त करून चालक नवनाथ गुळीग याला अटक केली. या ट्रकचा मालक सतीश गौंडवरही गुन्हा दाखल केला. तर तीन वाजण्याच्या सुमारास कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील जकात नाकयासमोर वाळूचा (एम.एच.10 झेड.4995) ट्रक पकडला. यात ट्रक जप्त करून चालक कृष्णदेव बजबळकर याला अटक केली असून मालक सचिन वाघमोड़े याच्यावरही गुन्हा दाखल केला. दोन्ही ट्रकमधील ही चोरटी वाळू कोळे (ता. सांगोला) येथून आणण्यात आली होती. पोलिसांनी दोन्ही ट्रक, त्यात काठोकाठ भरलेली वाळू असा सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांवर कुपवाड पोलिसांत महाराष्ट्र गौण खनिज कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या कारवाईत जप्त केलेल्या दोन्ही वाळू वाहतुकीच्या ट्रकवर मागे-पुढे कुठेही नंबरप्लेट नव्हती. नंबर प्लेटवर रंग फासून मालकाने अनेक महिन्यांपासून बेसुमार चोरटय़ा वाळू वाहतुकीतून महसूल बुडवून शासनाची लाखोंची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उजेडात आल्याने अशा वाळू चोरांवर महसूल प्रशासन व पोलिसांनी कड़क कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.