टोळीत सात जणांचा समावेश : सहाजणांना अटक, सर्व उत्तर भारतीय
प्रतिनिधी /वास्को
आयपीएल क्रिकेटच्या सट्टेबाजीत गुंतलेल्या टोळीला जेरबंद करण्यास वास्को पोलिसांना यश आले आहे. वाडे वास्कोतील एका इमारतीतील फ्लॅटवर गुरुवारी मध्यरात्री छापा मारून ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केलेली असून पाचजण महाराष्ट्रातील नागपूरचे तर एकटा राजस्थानमधील आहे. मात्र, सर्वजण मुळ उत्तर भारतीय आहेत.
विजय देविलाल जाट (23), दिलीप नानीकरम कुरक्रेजा (31), गुलशन इंदिरा कुमार टिकयानी (30), रोहित नरेश नादनानी (24), गिरीश दिवान ललवानी (26) व प्रकाश सिंग धुशान कनोजीया (29) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बरेच साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडे येथील डोंगरमाथ्यावरील एका इमारतीत आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार चालत होता. खास सुत्रांकडून पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्यामुळे गुरूवारी मध्यरात्री पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला आणि सहा जणांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून सट्टा बाजार चालवण्यासाठी वापरण्यात येत असलेले सर्व साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. यात दोन लॅपटॉप, कित्येक मोबाईल फोन्स, एक दूरदर्शन संच, लिहिण्यासाठी लागणारे काही साहित्य व अन्य साहित्याचा समावेश आहे.
आंतरराज्य सट्टेबाजांची टोळी
या इमारतीतील फ्लॅटमध्ये सहा दिवसांपासून हा बेकायदा व्यवहार होत होता व हा व्यवहार तेजीत होता. त्यामुळेच पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने छापा मारून कारवाई यशस्वी केली. ही टोळी सट्टा बाजार चालवणारी आंतरराज्य टोळी आहे. या व्यवहारासाठी गोवा सुरक्षित वाटल्याने त्यांनी गोव्याची निवड केली होती. मात्र, ते बेसावध राहिल्याने त्यांचे बिंग फुटले. अटक करण्यात आलेले सर्वजण 23 ते 31 वर्षे वयोगटातील आहेत.
फ्लॅट देणारा अद्याप गायब
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या फ्लॅटमध्ये हा सट्टा बाजार चाललेला होता, तो फ्लॅट एका व्यक्तीने त्यांना उपलब्ध केला होता. तो या टोळीशीच संबंधीत असून तो वास्कोतीलच आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिसांनी ही कारवाई केली.