प्रतिनिधी /वास्को
वास्को मांगोरहिल येथील एका गॅरेज बाहेर पार्क करून ठेवलेली चार वाहने सोमवारी सकाळी जळुन खाक झाली. यात एका जुन्या कारसह तीन दुचाकींचाही समावेश आहे. या घटनेत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून ही घटना घातपाताचा प्रकार असण्याचा संशय गॅरेज मालकाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीनुसार मांगोरहिल भागातील अंबाबाई मंदिरासमोरील रस्त्यावरील एका गॅरेजच्या बाहेर ही घटना घडली. वास्कोतील अग्नीशामक दलाला सकाळी पाचच्या सुमारास या घटनेसंबंधी फोन येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग निकामी करण्याच काम केले. त्यामुळे अधिक नुकसान टळले. मात्र, चारही वाहने पूर्णपणे जळुक खाक झाली. संबंधीत गॅरेज मालक महम्मद इशान यांनी उघड केलेल्या माहितीनुसार प्रथम त्याची कार जळाली व त्यानंतर इतर दुचाकी जळाल्या. दुचाक्यांमध्ये दोन ऍक्टीवा व अन्य एक दुचाकी आहे. त्या अन्य कुणी तरी रोजच्या प्रमाणे गॅरेजबाहेर पार्क केल्या होत्या. आगीत खाक झालेली कार भंगार अवस्थेतील होती. त्यात इंजिन, बॅटरी, इंधन व इतर महत्वाचे साहित्य नव्हते. गेली पाच वर्षे ती कार पडूनच होती. ती कार कशी पेटली हे कोडे उलगडलेले नसले तरी पूर्ववैमनस्यातून कोणी तरी हा प्रकार घडवून आणलेला असल्याचा संशय गॅरेज मालकाने व्यक्त केला आहे. या घटनेत सुमारे पाच लाखांची नुकसानी झाल्याचा अंदाज आहे. वास्को पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.