प्रतिनिधी /वास्को
वास्को कुठ्ठाळी महामार्गावरील चिखली नाक्यावर एक मिनी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या बसमध्ये एकूण 22 प्रवासी होते. चालकासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही वास्कोतीलच खासगी मिनी बस एका लग्न समारंभासाठी वास्कोहून शिरदोनकडे निघाली होती.
ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास चिखलीच्या मुख्य नाक्यावर घडली. वास्कोतून निघालेली बस चिखलीच्या नाक्यावर पोहोचताच बस चालकाला बसच्या समोरील भागातून आग व धूर निघत असल्याचे नजरेस आले. त्यामुळे चालकाने त्वरीत बसमधील लोकांना आगीची कल्पना दिली व त्वरीत बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे चालकासहीत सर्व प्रवासी झटपटखाली उतरले. ही आग रोखण्यासाठी पाणी आणण्यासाठीही काहीनी धडपड केली. परंतु आगीचा भडकाच उडाल्याने अग्नीशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्नीशामक दल दाखल होईपर्यंत या बसला आगीने पूर्ण घेरल्याने या बसची पूर्ण हानी झाली.
वास्को पोलीस स्थानकाचे हवालदार आशिष नाईक यांनी या घटनेचा पंचनामा केला. सदर बसला आग लागण्याचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किट झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.